कोलकाता, बदलापूरमधील बलात्काराच्या घटनांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त करून महिलांवरील अत्याचारात दोषी कुणीही असला तरी सुटता कामा नये, असा आदेश रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना दिला. पंतप्रधान महिलांविषयी आदरभाव व्यक्त करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांनी 400 बसगाड्या अडवल्याने लखपती दीदी मेळाव्यासाठी दूरवरून आलेल्या गोरगरीब महिलांचे पाच किलोमीटर चिखल तुडवत सभास्थळी जाताना मोठे हाल झाले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जीवनोन्नती अभियानातून राबविण्यात येत असलेला लखपती दीदी मेळावा आज रविवारी जळगाव विमानतळाशेजारील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क येथे घेण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत मराठीत भाषण सुरू केले. ते म्हणाले की, जळगाव ही संत मुक्ताईची भूमी आहे. बहिणाबाईची कविता प्रेरित करत आली आहे. मातृशक्तीचे योगदान अप्रतिम आहे. शिवाजी महाराजांना दिशा देण्याचे काम माँ जिजाऊंनी केले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण दिले. समाज आणि राष्ट्रासाठी इथल्या मातांनी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रातील बहिणींमध्ये जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप बघतो.
महिलांवर अत्याचार करणारे सुटता कामा नये
कोलकाता, बदलापूरमधील बलात्काराच्या घटनांनी उल्लेख करून त्यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. महिलांवरील हिंसा हे अक्षम्य पाप आहे. यात दोषी कुणीही असो, तो सुटता कामा नये. तसेच त्याला कोणत्याही स्वरूपाची मदत करणारेही सुटता कामा नये, असे आवाहन त्यांनी देशातील राजकीय पक्ष आणि राज्य सरकारांना केले. रुग्णालये, शाळा, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा, असे आदेशच त्यांनी दिले. सरकारे येतील आणि जातील, पण महिलांच्या सन्मानाचे रक्षण हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांनी बस अडवल्याने चिखल तुडवत महिला सभास्थळी
लखपती दीदी मेळाव्यासाठी राज्यभरातून लाभार्थी महिलांना आणण्यासाठी राज्य सरकारने एसटी बस बुक केल्या होत्या. त्यातून हजारो महिला सभेसाठी आणल्या. मात्र सभास्थळी पोहोचण्यात त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. पोलिसांनी जळगाव टोल नाक्यापासूनच रस्ता बंद केल्यामुळे या ठिकाणी ४०० हून अधिक बसगाड्या थांबवण्यात आल्या. त्यामुळे महिलांना चार किमी अंतर चिखल तुडवत, पाण्याच्या डबक्यांतून सभास्थळी जाताना हाल सोसावे लागले.
बसस्थानकावर तोबा गर्दी
लखपती दीदी मेळाव्यासाठी महिलांना आणण्यासाठी २३०० बसची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे जळगाव बसस्थानकावर पुरेशा बसगाड्या नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली हाती.
नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकार मदत करणार
नेपाळमधील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या कुटुंबांना केंद्र व राज्य सरकार पूर्ण मदत करेल, अशी घोषणा मोदी यांनी लखपती दीदी मेळाव्यात केली. ते म्हणाले की, नेपाळ बस दुर्घटनेत आपण जळगावातील अनेक सहकार्यांना गमावले. जेव्हा ही घटना घडली भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारशी संपर्क साधून राज्यमंत्री रक्षा खडसे यांना त्वरित नेपाळला जाण्यास सांगितले. दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह विशेष विमानाने आणले. जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडित कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.
नेपाळ अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांस केंद्राकडून 2 लाख , तर राज्याकडून ५ लाखांची मदत
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या मृतांच्या वारसांना केंद्र सरकारतर्फे प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत भाविकांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली.
चिकलठाणा विमानतळावर महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन
जळगावच्या लखपती दीदी मेळाव्यास जाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे विशेष विमान व ताफा सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावर आलेला असता महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने विमानतळासमोर मानवी साखळी करून निषेध आंदोलन करण्यात आले. हातात निषेधाचे फलक, काळे कपडे व काळ्या फिती बांधून कार्यकर्त्यांनी राज्यात व देशात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध व्यक्त केला. अर्ध्या तासाच्या मूक आंदोलनानंतर पोलिसांनी अंबादास दानवे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.