थंड, रसाळ ताडगोळ्यांमुळे स्थानिक विक्रेत्यांचे खिसे गरम, उन्हाचा तडाखा वाढताच किमती वाढल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडक उन्हाळ्यामुळे अंगाची काहिली झाल्याने नागरिकांचा कल शीतपेयांकडे वळला असून लिंबूपाणी, उसाचा रस, सरबत यांसोबतच सध्या बाजारात दाखल झालेल्या रसरशीत ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे. कासा, चारोटी परिसरासह मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत ताडगोळ्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. उन्हाचा तडाखा वाढताच किमती वाढल्या असून थंड, रसाळ ताडगोळ्यांमुळे स्थानिक विक्रेत्यांचे खिसे गरम होत आहेत.

डहाणू, बोर्डी तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची आवक बाजारात होत असून रस्त्यालगत अनेक विक्रेते ताडगोळ्यांची विक्री करताना दिसत आहेत. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी ताडगोळे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांकडून मोठी मागणी आहे. यंदा ताडगोळ्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. उंच ताडाच्या झाडावर चढून ताडगोळे उतरवण्याची प्रक्रिया अत्यंत कष्टाची आणि धोकादायक असल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. यामुळे तोडणीचा खर्च वाढला असून त्याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. सध्या बाजारात डझनला 150 रुपये दर असून मागील वर्षी हा दर सुमारे 120 रुपये होता.

आरोग्यदायी गुणधर्म

ताडगोळ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असून ते शरीराला थंडावा देतात. याशिवाय खनिजे, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस तसेच अ, ब आणि क जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते. आरोग्यदायी गुणधर्मांमुळे ताडगोळे हे उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ ठरत आहे.

डहाणू परिसरात ताडाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथूनच सर्वाधिक ताडगोळ्यांची आवक होत आहे. यंदा उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेते विनायक बसवत यांनी सांगितले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपूल परिसरात अनेक विक्रेते ताडगोळे विकताना दिसत आहेत. डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेसाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची खरेदी करत आहेत.