
मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये टॅक्सी सेवा पुरवणाऱया ओला आणि उबरसारख्या खासगी कंपन्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे. लवकरच ओला-उबरला सहकारी कॅबचा पर्याय उपलब्ध होणार आहे. देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. राजधानी दिल्लीत पायलट प्रकल्प राबवून त्यानंतर देशभरात हा उपक्रम राबविण्यात येईल.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने ‘भारत टॅक्सी’ या नावाने सहकारी टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. हे सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-शासन विभागाने विकसित केलेले पहिले राष्ट्रीय सहकारी राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये चालकदेखील सहमालक असतील. यासंदर्भात सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला गेला आहे. त्यानुसार पुढील महिन्यात दिल्लीत 650 चालकांसह पायलट प्रकल्प सुरू केला जाणार आहे. या सेवेत साधारण पाच हजार चालक व महिला सारथी सहभागी होणार आहेत. ओला-उबरसारख्या खासगी कंपन्यांची मनमानी मोडीत काढण्यासाठी सरकारने हे पाऊल टाकले आहे. ‘भारत टॅक्सी’ची ऍप-आधारित सेवा डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे. याअंतर्गत एक गव्हर्निंग कौन्सिल असेल. कौन्सिलचे अध्यक्ष अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता, तर उपाध्यक्ष एनसीडीसीचे रोहित गुप्ता असतील.


























































