मुंबईत कोरोनाचे 24 तासांत 22 रुग्ण, राज्यात दिवसभरात 33 जणांना संसर्ग

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना आज अचानक राज्यभरात 33 कोरोना रुग्ण सापडले. मुंबईत सर्वाधिक 22 रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यासह मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईत जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून तीन दिवसांपूर्वी केईएममध्ये दोघा कोरोना रुगणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेने सेव्हन हिल्स, कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 112 बेड राखीव ठेवले आहेत.

असे आढळले बाधित रुग्ण

जानेवारी ते आतापर्यंत 6477 कोरोना चाचण्या जानेवारी ते आतापर्यंत 165 रुग्ण पॉझिटिव्ह
गुरुवार 22 मे रोजी 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

ठाण्यात तिघांना लागण

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातही कोविडचे तीन रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण कोपरीतील असून त्यांची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे दोन रुग्णांवर घरात आणि एका रुग्णावर मुलुंडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यानंतर महापालिका आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली असून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 19 बेड्सचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. तसेच खासगी रुग्णांनाही चाचणी करण्याचे आणि रुग्ण आढळल्यास त्याची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.