सातारा जिह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस शिल्लक नाही

सातारा जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस व बूस्टर डोस घेणाऱयांमध्ये काही नागरिक अद्यापि शिल्लक आहेत. मात्र, गेल्या तीन आठवडय़ांपासून जिह्यात एकही लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. तथापि, लसींच्या डोसची मागणी केल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे.

गेल्या वर्षभरापासून कोविडच्या प्रादुर्भावाला आळा बसला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात जिह्यात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर जे नागरिक लसीकरणासाठी आरोग्य विभागात येतील, त्यांना लसीचा डोस देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिह्यात कुठलीच लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, जिह्यात एकूण 99 टक्के नागरिकांनी पहिला, 80 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे अद्यापि लसीकरणापासून 20 ते 22 टक्के नागरिक दूर आहेत; परंतु लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

घाबरण्याचे कारण नसल्याचा निर्वाळा

 जिह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱयांनी मास्कसक्ती केली होती. मात्र, त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून कानउघाडणी झाल्यामुळे मास्कसक्ती मागे घेतली आहे; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत जिह्यात 90 ते 95 रुग्ण असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.