कोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्राच्या पंखातील बळ गेलं, अनेक कंपन्या बंद पडण्याची भीती

1115

कोरोनाच्या उद्रेकामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला आहे. मात्र हवाई वाहतूक क्षेत्राला याचा सगळ्यात जास्त फटका बसल्याचं पाहायला मिळतं आहे. हिंदुस्थानातील हवाई वाहतूक क्षेत्राची अवस्था आधीच नाजूक झालेली आहे. कोरोनामुळे हे क्षेत्र आता अत्यवस्थ अवस्थेत पोहोचले आहे. या आजारामुळे देशातील काही हवाई वाहतूक कंपन्या बंद पडू शकतात आणि अनेकांचे रोजगार जाऊ शकतात अशी भीती वर्तवली जात आहे.

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेनं जारी केलेल्या आकड्यांनुसार जगभरातील हवाई वाहतूक कंपन्यांना जवळपास 113 अब्ज कोटी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. या आजाराच्या उद्रेकामुळे जगभरातील विमान कंपन्यांच्या बुकींगमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे तर या कंपन्यांना दरातही जवळपास 30 टक्क्यांची घट करावी लागली आहे. आशिया पॅसिफिक हवाई केंद्राने इशारा दिला आहे की जर सगळ्या देशांच्या सत्ताधाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केले नाही तर मे महिन्यानंतर जगभरातील अनेक हवाई वाहतूक कंपन्यांचे दिवाळे निघू शकते. हिंदुस्थानात कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून मंगळवार रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा आधीच बंद करण्यात आली होती. 14 एप्रिलपर्यंत ही विमानसेवा बंद राहणार आहे.

हिंदुस्थानात दररोज 4500 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे संचालन केले जायचे. यामध्ये जवळपास 600 आंतरराष्ट्रीय विमाने होते. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच देशांतर्गत विमानसेवेमध्ये 30 टक्के घट झालेली पाहायला मिळाली होती. आशिया पॅसिफिक हवाई केंद्राने भीती व्यक्त केली आहे की कोरोनामुळे 2021 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच जून 2021 मध्ये हिंदुस्थानातील हवाई वाहतूक क्षेत्राला 3.3 अब्ज ते 3.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागू शकते. हिंदुस्थानातील हवाई वाहतूक क्षेत्राला दिवसाला किमान 150 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. फिक्कीच्या आकड्यांनुसार एकट्या मार्च महिन्यात हिंदुस्थानच्या हवाई वाहतूक क्षेत्राला 8400 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या क्षेत्राच्या नफ्यातही 40 टक्के घट झाली आहे.

सर्वसाधारणपणे हवाई वाहतूक क्षेत्राला दिवसाला 400 कोटींचा महसूल मिळत असतो. या हिशोबाने एका महिन्याच्या लॉकडाऊनमुळे त्यांना 12 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते. हिंदुस्थानातील किंगफिशर, जेट, एअर इंडियासारख्या कंपन्या आधीच दिवाळखोरीत गेलेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे आणखी काही कंपन्यांचे दिवाळे वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे इंडीगो आणि स्पाईसजेटला पुढच्या आर्थिक वर्षात 230 कोटी तर स्पाईसजेट ला 525 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. लॉकडाऊननंतर म्हणजेच 15 एप्रिलनंतर हवाई वाहतूक क्षेत्र पुन्हा सुरू झालं तरी परिस्थिती लगेच सुधारेल अशी चिन्हे नाहीयेत. अनेक जण घाबरून हवाई प्रवास टाळण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा विश्वास पुन्हा दृढ व्हायला आणखी सहा महिने लागतील असा अंदाज आहे.

हवाई वाहतूक कंपन्यांकडे सध्या चलन तुटवडा आहे. सध्या कमाई काहीच होत नाहीये मात्र कर्मचाऱ्यांचे पगार, भाडी आणि अन्य खर्च होतोच आहे. अनेक हवाई वाहतूक कंपन्या विमाने भाड्याने घेतात. विमानांचे उड्डाण झाले नाही तर त्यांना या विमानाचे भाडे द्यावेच लागते. सद्य परिस्थितीत फक्त इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीकडे थोडीफार आर्थिक रसद आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुट्ट्यांमध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर हवाई वाहतूक क्षेत्राने केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी एक मोठा निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.एक मागणी अशीही करण्यात येत आहे की केंद्र सरकारने सगळ्या हवाई वाहतूक कर्मचाऱ्यांचा अर्धा पगार द्यावा, मात्र ही मागणी मान्य होणं थोडं अवघड आहे. असा परिस्थितीत सर्वात खालच्या थरातील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सरकार मदत करेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या