आशियाई स्तरावर उत्तुंग झेप घ्यायचीय! हिंदुस्थानी महिला संघाची बास्केटबॉलपटू श्रुती अरविंद हिचे स्वप्न

549

कोरोनामुळे बास्केटबॉल या खेळाचेही मोठे नुकसान झाले आहे. हा सांघिक खेळ असल्यामुळे सरावाला अद्याप ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलेला नाही. याप्रसंगी हिंदुस्थानी महिला संघाची बास्केटबॉलपटू श्रुती अरविंद हिच्याशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला. लवकरात लवकर खेळ सुरू व्हायला हवेत असे तिने यावेळी बोलून दाखवले. तसेच आगामी काळात हिंदुस्थानी संघाने आशियाई स्तरावर उत्तुंग झेप घ्यायला हवी यासाठीच प्रयत्न केले जाणार आहेत, असे ती पुढे विश्वासाने म्हणाली.

लवकरात लवकर खेळ सुरू व्हायला हवा

बास्केटबॉल हा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आमच्या खेळाला सुरुवात होईल असे वाटत नाही, पण तरीही लवकरात लवकर खेळ सुरू व्हावा असे मनापासून वाटते. सीनियर राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्यास आनंद होईल. ऑक्टोबर महिन्यापासून बास्केटबॉलची सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे श्रुती अरविंद हिला वाटते.

क्रीडापटू व्हावे ही वडिलांचीच इच्छा

माझे वडील व्हॉलीबॉल उत्तम खेळायचे, पण त्या काळात कुटुंबीयांकडून त्यांना सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे मी जेव्हा बास्केटबॉल खेळायला लागली, तेव्हा माझ्या वडिलांकडून मला प्रोत्साहन मिळू लागले. मी क्रीडापटू व्हावे ही वडिलांचीच इच्छा होती. त्यामुळे मला माझ्या कारकीर्दीत कुटुंबीयांकडून कोणतीही अडचण आली नाही, असे स्पष्ट मत श्रुती अरविंद हिने व्यक्त केले.

दस्तूर हायस्कूलमुळे बास्केटबॉलमध्ये रस

पुण्यामध्ये माझी जडणघडण झालीय. दस्तूर हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. ही शाळा बास्केटबॉल या खेळासाठीच ओळखली जाते. या खेळाकडे इयत्ता पाचवीपासून माझी पावले वळू लागली. कळत नकळत बास्केटबॉल या खेळाकडे वळल्यानंतर कालांतराने यामध्ये रस वाढू लागला. ललित नहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉल या खेळाचे बाळकडू आत्मसात केले, असे श्रुती अरविंद हिने सांगितले.

स्वतःसाठी वेळ मिळाला

कोरोना व लॉकडाऊनमुळे जगामध्ये सर्व काही वाईट झाले आहे, पण एक बाब येथे प्रकर्षाने बोलून दाखवावी लागणार की, यामुळे आपल्याला कुटुंबासोबत वेळ घालवता आला आहे. मी एक खेळाडू असल्यामुळे वर्षभर बिझी असते. तसेच माझा नवराही बास्केटबॉलपटू असल्यामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांना वेळ देता येत नाही. या कालावधीत आम्ही एकमेकांसोबत चांगले क्षण घालवले. याचदरम्यान माझ्या कमकुवत बाजूंवरही मेहनत घेतली. तसेच ऑनलाइन प्रशिक्षणही घेण्यात येत होते. प्रशिक्षक मनीषा डांगे यांच्याकडून व्हॉटस्ऍपद्वारे दररोज वर्कआऊटबाबत माहिती दिली जात होती, असे श्रुती अरविंद यावेळी म्हणाली.

उंचीमुळेही फरक पडतो

बास्केटबॉल या खेळामध्ये प्रगती करायची असल्यास या खेळातील खेळाडूंची उंची चांगली असायला हवी. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, रशिया, चीन हे संघ बास्केटबॉलमध्ये शानदार कामगिरी करताहेत. यामध्ये जपानचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यांच्या संघातील खेळाडूंची सरासरी उंची 5.8 फक्त इतकी असूनही वेगवान अन् चपळ खेळाच्या जोरावर त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये मोठी झेप घेतली आहे. हिंदुस्थानी संघातील खेळाडूंची उंची कमी असते, पण हे कारण देऊन चालणार नाही. सध्या हिंदुस्थानचे दोन्ही संघ (पुरुष/महिला) चांगली कामगिरी करताहेत. तसेच युवा खेळाडूंसाठी कॅम्पचे आयोजन करून त्यांना अमेरिकेत प्रशिक्षणासाठी नेण्यात येत आहे. त्यामुळे बास्केटबॉल या खेळात हिंदुस्थानचे भविष्य उज्ज्वल आहे, असे श्रुती अरविंद यावेळी म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या