चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होत असल्याचा मेसेज व्हायरल केल्यास आता जेलची हवा

961

ब्रॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे. त्यामुळे चिकन खाऊ नये असा मेसेज आता जर कोणी सोशल मीडियावर पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत. चिकन खाल्याने कोरोनाचा धोका असल्याची अफवा पसरवल्यामुळे ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. परिणामी पोल्ट्री फार्म चालवणाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्याला आता जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे.

चीनमधील कोरोना विषाणूपेक्षा सध्या सोशल मीडियावर अफवा वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. ब्रॉयलर कोंबडी खाल्यास कोरोनाची लागण होऊ शकते असा मेजेस सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या खोटय़ा मेसेजचा फटका राज्याच्या ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. एका वृत्तानुसार लातूर जिह्यात दररोज 30 ते 35 टन कोंबडीच्या मासांची विक्री होत होती, तर लातूर शहरात 10 ते 12 टन चिकनची मागणी होती. पण या अफवेमुळे कोंबडीची मागणी साठ टक्क्यांनी घसरली आहे.

चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेत. पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या विषयात पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले की, चिकन खाल्याने कोरोनाची लागण होत नाही. मात्र कोरोना विषाणूचा संबंध कोंबडी खाल्याशी जोडला आणि अफवा पसरवण्यास सुरुवात झाली. या अफवेमुळे राज्यातील कोंबडी उत्पादक व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय होतो. त्यातून मोठय़ा प्रमाणावर युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होतो. पण या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशी अफवा सोशल मीडियावर पसरवणाऱ्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश आपण दिले आहेत, असे सुनील केदार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या