पुण्यातील घाऊक फुलबाजार १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

261

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजार 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. यापूर्वी हा बाजार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी बाजार सुरू करायचा अथवा नाही याबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये बाजार बंद ठेवण्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, फुलबाजार आडते व व्यापारी संघटना,अखिल मार्केट यार्ड फुलबाजार आडते असोसिएशन यांची सोमवारी बैठक पार पडली. त्यात फुल बाजार १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचं ठरवण्यात आलं. फुलांचा जीवनावश्यक शेतमालात समावेश करण्यात आलेला नाहीये. यामुळे 31 मार्चपर्यंत फुलबाजार बंद ठेवण्याचं ठरलं होतं. सद्य:परिस्थितीत दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि पदार्थांनाच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या मंदिरे बंद असून विवाह सोहळे, यात्रा, जत्रा रद्द झाल्याने फुलबाजारात मागणी कमी आहे. फुलांचा बाजार कमी जागेत भरत असल्यामुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून बाजार 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचं निश्चित झालं आहे. सर्व अडतदार, व्यापारी व कामगार वर्ग स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील, अशी माहिती फुलबाजार आडते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड आणि अखिल फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या