तबलिगींमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली, 14 राज्यात जमातचे 647 कोरोनाग्रस्त सापडले

4521

गेल्या 3 दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. 31 मार्चला ही संख्या 1351 होती जी 3 एप्रिल रोजी 2547 इतकी झाली आहे. या वाढीचे मुख्य कारण हे तबलिगी जमातने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन कोरोनाची लागण करून घेत विविध राज्यात परतलेले जमात सदस्य किंवा पाठीराखे आहे.

देशात शुक्रवारी 478 कोरोनाग्रस्त सापडले होते. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर या आजाराचे रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ आहे. यातल्या 247 जणांनी दिल्लीतील निजामुद्दीन भागात आयोजित करण्यात आलेल्या जलशामध्ये भाग घेतल्याचं सिद्ध झालं आहे. या जलशाला देश-विदेशातून किमान 4 हजार लोकांनी हजेरी लावली असावी असा अंदाज आहे. आतापर्यंत 14 राज्यात या जलशाला हजेरी लावणारे आणि कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. गुरुवारपर्यंत असे 400 कोरोनाग्रस्त सापडले होते, ज्यात शुक्रवारी नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली. यामुळे दिल्लीतील जलशाला हजेरी लावणारे आणि कोरोनाची लागण झालेले असे मिळून आता 647 जण सापडले आहेत. हा आकडा आणखी वाढत जाणार आहे, कारण या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या सगळ्यांची ओळख पटवून त्यांची चाचणी करण्याचे काम पूर्ण झालेले नाहीये.

अनेक राज्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या जमातींमुळे त्यांच्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते आहे. तमिळनाडू याचं मोठं उदाहरण आहे. इथे शुक्रवारी 102 कोरोनाग्रस्त सापडले. यातले 100 रुग्ण हे दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावणारे आहेत. तेलंगणात शुक्रवारी 75 तर उत्तर प्रदेशात 48 पैकी 40 कोरोनाग्रस्त हे जमातीचे पाठीराखे अथवा सदस्य असून त्यांनी दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याचं कळालं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्याबाबत बोलताना सांगितले गेल्या काही दिवसातील घटनांमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. अन्यथा दोन व्यक्तींमध्ये ठराविक अंतर राखणे, लॉकडाऊन यामुळे हा आकडा झपाट्याने वाढला नव्हता. आपण संसर्गजन्य आजाराशी सामना करत असून एका व्यक्तीने जरी चूक केली तर सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात. तमिळनाडूच्या आरोग्य सचिव बिला राजेश यांनी सांगितले की त्यांच्या राज्यात 411 पैकी 364 कोरोनाग्रस्त हे दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला जाऊन आलेले आहेत. तमिळनाडूतून दिल्लीला या कार्यक्रमासाठी गेलेले आणि परत आलेले 1200 जण सापडले असून त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यातील 300 जणांचा पहिला अहवाल हा निगेटीव्ह आलेला आहे असं बिला यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या