कुडाळ बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी,सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. शासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार 14 एप्रिल पर्यंत शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. त्यानुसार कुडाळला बुधवारी भरणारा आठवडा बाजार तसेच रविवारी भरणारा गावठी बाजारही रद्द करण्यात आला आहे. याबाबत न.पं. प्रशासनाने बुधवारी आठवडा बाजाराचा दिवस समजून नागरिकांनी गर्दी करू नये तसेच बाजारात येऊ नये असे आवाहन केले आहे. मात्र बुधवारी कुडाळ बाजारपेठेत नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बाजारपेठेत अत्यावश्यक साहित्य विक्री करणारी किराणा स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, भाजीपाला, फळ, चिकन व मटण सेंटर सुरू होती. तिथे खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. बॅकांमध्येही ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात संपूर्ण बाजारपेठेतील रस्ता नागरीकांच्या वर्दळीने गजबजून गेला होता. शासनाकडून वारंवार गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. कुडाळ न.पं. प्रशासनही ध्वनीक्षपकाद्वारे सोशल डिस्टनींग बाबत शहरात वारंवार आवाहन करीत आहे. मात्र बुधवारी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. न.पं. मार्फत नागेश नेमळेकर ध्वनीक्षपकाद्वारे सोशल डिस्टनींगचे पालन करण्यासह नागरिकांनी गर्दी टाळावी, साहीत्य खरेदी करून झाले असल्यास घरी जावे, अनावश्यक फिरत राहू नये असे आवाहन केले जात होते. त्याशिवाय पोलिस प्रशासनाकडूनही नागरिकांना गर्दी टाळण्याबाबत आवाहन केले जात होते.

आपली प्रतिक्रिया द्या