लॉकडाऊनने स्वावलंबी बनवले!

विराजस कुलकर्णी, अभिनेता

लॉकडाऊनच्या चार दिवस अगोदर माझे आजोबा वारले. लॉकडाऊन होणार असल्याने मालिकेचे एक-दोन दिवसांचे शूटिंग उरकून मी पुणे गाठले. मी फारसे कपडे वगैरे पण नेले नव्हते. अशा अवस्थेतच मला तीन महिने पुण्यात मुक्काम करावा लागला. बारावीनंतर मी मुंबईत शिफ्ट झालो. त्यानंतर पहिल्यांदाच इतके दिवस मी पुण्यातील घरी राहिलो. त्या घरात माझं लहानपणीच कपाट त्यातील वहय़ा, पुस्तके अजूनही तसेच आहेत. यानिमित्ताने जुन्या आठवणींमध्ये रमलो.

मला लिखाणाची खूप आवड आहे. ‘माझा होशील ना’ मालिका सुरू होण्यापूर्वी मी दोन सिनेमांचे लिखाण करत होतो. परंतु मालिका अचानक सुरू झाल्याने माझे लिखाण काहीसे मागे पडले होते. ते मी या काळात पूर्ण केले. आता या कथानकावर सिनेमा कधी येईल हे सांगता येत नाही. पुण्यात माझा ‘थिएटरॉन’ नावाचा ग्रूप आहे. त्यांच्यासोबत यू टय़ूब चॅनेलवरून आम्ही गंमतीदार बातम्या द्यायचो. घरात राहून मी ‘फरिश्ता’ नावाची शॉर्ट फिल्म बनवली आहे. लॉकडाऊनवर आधारित ही हॉरर शॉर्ट फिल्म असून हिचे संपूर्ण शूटिंग मोबाईलवर केले आहे. या शॉर्ट फिल्मसाठी ऍक्टिंग, एडिटिंग, शूटिंग असे सर्व काही मीच केले आहे. त्यामुळे त्यात छान वेळ गेला.

एरव्ही बाहेर आपण इतका वेळ घालवतो की घरातल्यांसोबतचा आपला धागा कुठेतरी तुटतोय की काय असे वाटते. परंतु या काळात कुटुंबीयांना मनसोक्त वेळ देता आला. लॉकडाऊनने खरं सांगायचं तर मला स्कावलंबी बनविले. घरात केवळ बसून न राहता आईला घरकामात, सफाईमध्ये मदत करणे सुरू होते.

पुनःश्च हरिओम!

नुकतीच पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेटवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागतेय. कलाकार सोडले तर स्टाफ संपूर्ण वेळ  ग्लोव्ह्ज आणि मास्कमध्ये असतो. मेकअपमनला पीपीई किट घालून काम करावे लागतेय. आधी प्रत्येक डिपार्टमेंटमधील कर्मचारी आपापले काम करायचे. आता फक्त 33 टक्के कर्मचारी असल्याने सगळे एकमेकांना मदत करतात. पण सगळय़ांना खूप दिवसांनी भेटण्याचा वेगळाच आनंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या