रशियात लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर गोंधळ घातला, भडकलेल्या डॉक्टरने 5 जणांना ठार मारलं

कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. रशियामध्येही लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या लॉकडाऊनदरम्यान एका डॉक्टरने 5 जणांना गोळ्या घालून ठार मारलं आहे. अँटन फ्रँचिकोव्ह असं या डॉक्टरचं नाव असून तो 31 वर्षांचा आहे.

लॉकडाऊन असतानाही रशियातील काहीजण घोळक्याने बाहेर पडले होते. यातील एक घोळका अँटनच्या घराबाहेर जमला होता. तिथे यातले काहीजण गोंधळ घालत आरडाओरडा करत होते. या गोंधळामुळे अँटन वैतागला होता. त्याने घराच्या बाल्कनीमध्ये येऊन गोंधळ घालणाऱ्यांना झापले होते. यामुळे या घोळक्यातील काही जण बिथरले आणि त्यांनी अँटनच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अँटनने त्यांना रोखण्यासाठी त्याच्याकडे असलेली शिकारीची बंदूक काढली आणि गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

अँटनने ज्या 5 जणांना ठार मारलं आहे त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला गर्भवती होती. पोलिसांनी अँटनची चौकशी केली, यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की त्याचा मुलगा झोपलेला होता. घराबाहेर सुरू असलेल्या गोंधळामुळे तो उठण्याची शक्यता होती. मुलगा उठू नये म्हणून अँटनने गोंधळ घालणाऱ्यांना झापले होते. लॉकडाऊन असताना आणि लोकांना विलगीकरणात राहायला सांगितलेले असताना तुम्ही बाहेर का फिरताय असा सवाल अँटनने या लोकांना विचारला होता. अँटन या गोंधळ घालणाऱ्यांना पोलीस बोलावून हुसकावून लावू शकला असता, त्याने कायदा हातात घेऊन चूक केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या