पीएमना काही केअरच नाही! रेल्वे कर्मचाऱ्यांनी सढळहस्ते दातृत्व दाखवूनही भत्ते गोठवले

2205

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडाला सढळ हस्ते मदत केली असताना दुसरीकडे केंद्राने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या डीए भत्त्यात कपात करण्याचे संकेत दिल्याने कामगारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. अठरा महिन्यांच्या डीएवर हातोडा मारल्याने केंद्राच्या तिजोरीत 75 हजार कोटींची भर पडणार आहे. दुसऱ्या बाजूला एकट्या रेल्वे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पीएम केअर फंडाला 146.72 कोटी रुपयांची मदत केली आहे. मात्र असे असतानाही केंद्राने सरकारी कर्मचा-यांच्या डीए भत्त्याला हात लावल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

रेल्वे बोर्डाच्या अधिकारी, आरसीएफ कारखाना आणि रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातील क्कंपन्यांनी देखील सढळहस्ते ‘पीएम केअर फंडा’ला मदत केली आहे. रेल्वेच्या सीसीटीव्ही नेटवर्क सांभाळणाऱ्या रेलटेल कंपनीने 10 कोटींचा निधी कोरोना पीएम केअर फंडाला दिला आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार विभागून पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याचे म्हटले आहे.

211 कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या पगारापेक्षा जादा रक्कम दिली

देशभरात रेल्वेचे सुमारे 13 लाख कर्मचारी आहेत. रेल्वेचे कोलकाता मेट्रो पकडून अठरा झोन आणि इतर विभागातील ऑन रोल असलेल्या सुमारे 12 लाख 17 हजार 321 कर्मचारी वर्गाने किमान एक दिवसाचा पगार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम या फंडाला दिली आहे. 211 कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनापेक्षा जादा रक्कम पीएम केअर फंडाला दिली आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे ‘एनआर‌एमयू’ कर्मचारी संघटनेने पीएम केअर फंड आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एकूण 1 कोटी दोन लाख रुपयांची मदत केल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ. वेणू नायर यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याला हात लावण्याचे संकेत दिले आहेत. जानेवारी 2020 पासून जुलै 2021 पर्यंत डीएच्या अपेक्षित वाढ गोठवण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा अशी मागणी नायर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या