चाळकऱ्यांवर सूड उगवण्यासाठी कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवली, डोंबिवली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

1485

डोंबिवली पोलिसांनी एका 44 वर्षांच्या व्यक्तीविरूद्ध अफवा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. संदीप शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. त्याने अफवा पसरवली होती की त्याच्या चाळीमध्ये राहणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला तेव्हा शिंदेने चाळीत त्याच्याविरूद्ध असणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हा उपदव्याप केल्याचं कळालं.

शनिवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीतील विष्णूननगर पोलिसांना एक फोन आला होता. हा फोन संदीप शिंदे यानेच केला होता. शिंदेने पोनवरून तक्रार केली की साई दत्त चाळीमध्ये लॉकडाऊन असतानाही काही मुलं क्रिकेट खेळत आहेत. या तक्रारीमुळे 4 पोलिसांचं एक पथक या चाळीमध्ये पोहोचलं. संदीप शिंदे यांना हे पथक भेटलं तेव्हा त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. या चाळीतल्या लोकांना करोनोची लागण झाल्याचं त्याने पोलिसांसमोर आरडाओरडा करताना सांगितलं. या सगळ्यांचं घरात विलगीकरण करायला हवं ते बाहेर का फिरतायत असंही शिंदे बोलला. त्याच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी चाळीमध्ये चौकशी करायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांना कळालं की संदीप शिंदे याने त्याच्या चाळीत कोरोनाची लागण झाल्याची खोटी तक्रार तहसीलदारांकडेही केली होती.

पोलिसांनी परिसराची पाहणी केली आणि त्या परिसरात कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची खात्री करून घेतली. यानंतर त्यांनी पुन्हा शिंदेला गाठले आणि त्याला विचारले की तू बाहेर फिरतोयस मास्क का घातला नाहीयेस? यावर शिंदेने त्यांना सांगितले की मास्क कोरोनाची लागण रोखू शकत नाही. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तर अनेकांना या आजाराची लागण होणार आहे आणि ते मरणार आहे असं शिंदे तोंडाला येईल ते बोलत होता. शिंदे याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध अफवा पसरवल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या