लॉकडाऊनमुळे तमिळनाडूला चालत निघाला, तरुणाचा हैदराबादमध्ये मृत्यू

तमिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या एका तरुणाचा हैदराबादमध्ये मृत्यू झाला आहे. हा तरुण अवघ्या 23 वर्षांचा होता. जवळपास 500 किलोमीटरचं अंतर तो पार करून आला होता. बुधवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन झाले. देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर विविध राज्यातील कष्टकऱ्यांनी आपल्या गावाला पायी जाण्याचं ठरवलं होतं. हा तरुण देखील त्यातलाच एक होता.

बी.लोगेश असं या तरुणाचं नाव असून, त्याने वर्ध्यापासून या चालायला सुरुवात केली होती. काही ठिकाणी त्याला ट्रकने लिफ्ट दिली, हा अपवाद वगळता त्याने 500 किलोमीटरमधील बरचसं अंतर हे पायी कापलं होतं. त्याच्याचप्रमाणे चालत असलेल्या किमान 10-12 जणांना हैदराबाद पोलिसांनी अडवलं होतं आणि तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये त्यांना पाठवलं होतं. या निवाऱ्यामध्येच लोगेशचा मृत्यू झाला. अत्यंत दमल्याने आणि शरिरातील पाणी कमी झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लोगेशचे वडील हे सुरक्षारक्षकाची नोकरी करतात तर त्याची आई ही कपड्याच्या फॅक्टरीमध्ये कामाला होती. दोन महिन्यांपूर्वीच लोगेश नागपुरातील एका कंपनीत कामाला लागला होता. 30 मार्चला लोगेश आणि इतरांनी नागपुरातून तमिळनाडू गाठण्यासाठी चालायला सुरुवात केली होती. 1 एप्रिलला त्यांना हैदराबादमध्ये अडवण्यात आलं होतं. तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये पाठवण्यात आल्यानंतर रात्रीच्या जेवणाची आणि आंघोळीची व्यवस्था सगळ्यांना करून देण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर लोगेशची शुद्ध हरपली आणि तो कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्याच्यावर हैदराबादमध्येच अंतिम संस्कार करण्याचं ठरवण्यात आलं होतं, मात्र तमिळनाडू सरकारने हस्तक्षेप करत त्याचा मृतदेह गावी आणण्याची व्यवस्था केली. 800 किलोमीटरचं अंतर पार करून ही अँम्ब्युलन्स शुक्रवारी त्याच्या गावात पोहोचली.

आपली प्रतिक्रिया द्या