लोकांनी ऐकलं नाही तर दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील, KCR यांचा इशारा

2647

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता याबाबतची घोषणा केली. या घोषणेनंतरही रस्त्यावर अनेक जण फिरताना दिसत असून त्यांना या आजाराचे आणि सध्याच्या परिस्थितीचे अजिबात गांभीर्य दिसत नसल्याचे दिसून येत आहे. लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, जर त्यांनी केले नाही तर तेलंगाणामध्ये सैन्य बोलवावे लागेल आणि लोकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही असा इशारा तिथले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.

सोमवारी आणि मंगळवारी संध्याकाळी अनेक जण बाहेर फिरायला निघाले होते. रविवारच्या दिवशी जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला खरा मात्र थाळ्या-टाळ्या वाजवण्यासाठी अनेक जण रस्त्यावर झुंडीने उतरले होते. ही दृश्ये पाहून पुढचे दोन दिवस काही नागरीक बेफिकीरपणे रस्त्यावर उगाच फिरताना दिसत होते. या नागरिकांना पोलिसांनी दांडके हाणून घरी पाठवलं मात्र तरीही रस्त्यावर नागरिकांचं फिरण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. ही परिस्थिती बघितल्यानंतर राव यांनी तेलंगणामध्ये संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. संध्याकाळी 6 वाजता दुकाने बंद झालीच पाहिजेत असे त्यांनी आदेश दिले आहेत. जर तरीही लोकं ऐकली नाही तर मला 24 तासांच्या कर्फ्यूचे आदेश जारी करावे लागतील असा इशाराही राव यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या