आंदोलनाचे अंगण वाकडे! ‘माझं अंगण,रणांगण’ आंदोलनाचे तीनतेरा

2956

कोरोनाचे संकट रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे सांगत भाजपने राज्यभरात शुक्रवारी महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझं अंगण, रणांगण’ असा नारा देत सरकार विरोधात आंदोलन पुकारले खरे, मात्र याकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांव्यतिरिक्त कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेने अक्षरश: पाठ फिरवली. यामुळे ‘आंदोलन जमेना, भाजपचे अंगण वाकडे’ अशीच काहीशी स्थिती राज्यभरात झाली. सोशल मीडियावर देखील भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’पेक्षा ‘महाराष्ट्रद्रोही बीजेपी’ ट्रेंड सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सरस ठरला.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपनं कोरोना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा विचार करता शेतकरी, मजूर, बाराबलुतेदार यांच्यासाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे या मागणीसाठी राज्यात भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. याचाच एक भाग म्हणून काळे कपडे परिधान करत काळे झेंडे, काळे फलक फडकावून भाजपनं सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये आंदोलन केले.

नाराज खडसे, पंकजा मुंडे आंदोलनात; कार्यकर्त्यांची मात्र पाठ
भाजपचे नाराज नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी जळगाव येथे तर पंकजा मुंडे यांनी मुंबईत वरळी येथे आंदोलन केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दहिसर येथील कार्यालयाबाहेर आंदोलन केले. माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, बबनराव लोणीकर, सुधीर मुनगुंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील आदी भाजपच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात आंदोलन केले. मात्र नेहमी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग नोंदवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र राज्यभरात होते.

लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना आंदोलनात उतरले
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांमध्ये केंद्र सरकारकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या बाहेर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असतानाही लहान मुलांच्या हातात फलक घेऊन सहभागी करून घेण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते हे विशेष.

ट्विटरवर भाजपविरोधी सूर
कोरोना संकट काळात राजकारण करणाऱ्या भाजपविरोधात सोशल मीडिया जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. महाराष्ट्र बचाव हॅशटॅग वापरत भाजपनं सरकार विरोधात ट्विटरवर मोहीम चालवली. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रद्रोही बीजेपी हॅशटॅग वापरून सुरू केलेल्या मोहिमेला सर्वाधिक प्रतिसाद देत, नेटकऱ्यांनी भाजपविरोधात मत प्रदर्शित केले.

आपली प्रतिक्रिया द्या