मुंबईत कोरोनाचे 1411नवे रुग्ण! एकूण रुग्णसंख्या 22 हजार 563 वर

743

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ कायम असून आज आणखी 1411 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात 428 प्रलंबित पॉझिटिव्ह अहवालांचा समावेश आहे. तर 15 प्रलंबित अहवालांसह 43 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 22 हजार 563 वर पोहोचला आहे.
मुंबईत मृत झालेल्या 43 जणांमध्ये 29 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. यातील 32 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते अशी माहितीही पालिकेकडून देण्यात आली. यामुळे एकूण मृतांचा आकडा 800 झाला आहे. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये 14 ते 16 मे रोजी झालेल्या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आलेल्या 428 रिपोर्टचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईत एकाच दिसांत 600 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 6116 झाली आहे.

दादरमध्ये कोरोनाबाधितांसाठी ‘लाफिंग थेरपी’
दादारमध्ये कोरोनाबाधित लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी ‘लाफिंग थेरपी’चा प्रयोग करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दादरच्या डिसिल्वा स्कूलमध्ये असणार्‍या कोविड केअर सेंटर – 2 मध्ये ही थेरपी सुरू आहे. यामध्ये रुग्ण ‘यम्मा यम्मा ये खुबसुरत समा… बस आज किस की रात है, जिंदगी कल हम कहा, तुम कहा’ अशी गाणी गात आहेत.

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा महापौरांकडून आढावा
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयांचा दुसऱ्यांदा आढावा घेणे सुरू केले असून आज कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी महापालिका रूग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या टीम सोबत चर्चा केली. महापौर किशोरी किशोर पेडणेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, रुग्णालयाने ज्येष्ठ नागरिकांना ऑक्सीमीटर उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून जेष्ठ नागरिक स्वतः आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासून घेतील. ज्या ज्येष्ठ नागरिकाचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे ते स्वतःहून रुग्णालयात दाखल होतील. त्यामुळे कोरोना बाधितांसोबत त्यांचा थेट संपर्क येणार नाही. त्यांची वेगळी व्यवस्था करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे कोरोनाची सौम्य लक्षणे व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची वर्गवारी करून त्यांच्या वर्गवारीनुसार त्यांना रूग्णालयात दाखल करून घेण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद नगरकर, डॉ. तनुजा बारोट, डॉ. अंकुश, डॉ.सत्यजित उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या