Corona Virusचा धसका पश्चिम, मध्य रेल्वे, बेस्टचे प्रवासी दहा लाखांनी घटले

कोरोनाच्या भीतीने गर्दीच्या ठिकाणांवर जाण्यावर निर्बंध आल्याने मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलचे दररोजचे प्रवासी घटले आहेत. पश्चिम, मध्य आणि बेस्टचे प्रवासी लाखांनी घटल्याची  आकडेवारी समोर आहे. पश्चिम रेल्वेचे प्रवासी आठ ते दहा लाखांनी तर मध्य रेल्वेचे प्रवासी 11 लाखांनी घटले आहेत. तर किमान पाच रुपये तिकीट दरांमुळे 34 लाखांवर गेलेली बेस्टची प्रवासी संख्या 24 लाखांपर्यंत घसरली आहे.

मध्य रेल्वेवर दररोज साधारण 43 लाख प्रवासी प्रवास करतात. तर पश्चिम रेल्वेची रोजची प्रवासी संख्या 36 लाख इतकी आहे. सोमवार, 16 मार्च रोजी पश्चिम रेल्वेवर 40 लाख 75 हजार 705 इतके प्रवासी होते. 17 मार्च रोजी रोजचे प्रवासी 32 लाख 60 हजार 878 इतके कमी झाले होते, तर 18 मार्च रोजी प्रवासी संख्या आणखी घटून 26 लाख 29 हजार 974 इतकी झाली आहे. म्हणजे पश्चिम रेल्वेची रोजची प्रवासी संख्या दहा लाखाने घटली आहे. मध्य रेल्वेवर सोमवार, 16 मार्च रोजी 50 लाख 23 हजार 631 प्रवासी होते. 17 मार्च रोजी ते 40 लाख 43 हजार 718 झाले तर 18 मार्च रोजी त्यात आणखी घट होऊन 32 लाख 36 हजार 75 इतके झाले आहेत. मध्य रेल्वेचे प्रवासीही 10 लाखांनी घटले आहेत.

टॅक्सींना पार्किंगसाठी जागा मिळेना

कोरोनाच्या भीतीने प्रवासी घटल्याने टॅक्सीचालकांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. 50 टक्के व्यवसाय बंद असल्याने अर्धे चालक गावी गेल्याने रिकाम्या टॅक्सी पार्क करण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी अशा मीटर टॅक्सींना पार्किंगसाठी सूट द्यावी, त्यांच्याकडून दंड आकारू नये अशी विनंती टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना पत्र पाठवून केली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या उद्या शुक्रवार, 20 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर वातानुकूलित लोकलच्या 16 फेऱ्या चालविण्यात येत असतात त्या जागी उद्यापासून साध्या लोकल चालविण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरारदरम्यान वातानुकूलित लोकलच्या 12 फेऱ्या चालविण्यात येतात. त्याऐवजी साध्या लोकलच्या 12 फेऱ्या होणार असून एकूण फेऱ्यांची संख्या नेहमीसारखीच राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या