मग संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? राजू शेट्टी यांचा सवाल

729

धारावीत कोरोनावरील नियंत्रणाचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे खेचण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवले तर मग संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा, अशा शब्दात भाजपचा समाचार घेतला आता स्वयंसेवकांनी संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याचे काम करावे असा उपरोधिक टोलाही त्यांनी मारला.

मुंबई महापालिका, राज्य सरकार व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवले. जागतिक आरोग्य संघटनेने या प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर शाब्बास धारावी अशा शब्दात धारावीकराच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. कोरोना विरुध्दच्या लढाईतील रोल मॉडेल म्हणून धारावीने जागतिक स्तरावर आपले नाव नोंदवले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले होते.मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घराघरांमध्ये जाऊन स्क्रिनिंग केले त्यामुळे केवळ सरकारने याचे श्रेय घेऊ नये असे वक्तव्य केले होते.

मग संघाने महाराष्ट्र कोरोनामुक्त करावा

त्याकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर कडक शब्दात टीका केली. मुंबईत धारावी कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला होता. तेव्हा धारावीत संघाच्या कार्यकर्त्यांची मदत आणि बचाव कार्य सुरु असल्याची एकही बातमी वाचनात आली नाही. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले तेव्हा मात्र श्रेय घेण्यासाठी पुढे आले. धारावीत संघाच्या स्वयंसेवकांनी काम केले असेल तर मग संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरत आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहे का नाही याची मला कल्पना नाही राज्याच्या इतर शहरातही कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी इतर ठिकाणीही जावे. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याचे काम करावे महाराष्ट्र त्यांनी धन्यवाद देईल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या