आगामी वर्षाचा मालमत्ता कर 31 मे पर्यंत भरणा-यांना सवलत, पिं.चिं. महापालिकेचा नागरिकांना दिलासा

432

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांना दिलासा दिला आहे. 31 मे 2020 अखेर थकबाकीसह संपूर्ण मिळकत कराचा एक रक्कमी 100 टक्के भरल्यानंतर भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या महापालिका कराच्या विलंब दंड रक्कमेत 90% सवलत देण्यात आली आहे. तर, 31 मार्च 2021 अखेर चालू मिळकत करावर देय असणारा महापालिका शास्ती कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे.त्यानुसार 1 एप्रिल 2020 ते 31 मे 2020 अखेर थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची एक रक्कमी 100 टक्के रक्कम भरल्यानंतर भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या महापालिका कराच्या विलंब दंड रक्कमेतील 90 टक्के सवलत देण्यात आली आहे. तर,1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 अखेर चालू मिळकतकरावर अनुसूची ‘ड’ प्रकरण 8 नियम 51 अन्वये देय असणारी शास्ती फी (मनपा शास्ती कर ) पूर्ण माफ करण्यात आला आहे.

1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या कालावधीत मिळकत कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य करतील सवलत योजना लागू राहील. तसेच ज्या माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी / फक्त महिलांचे नावे असलेल्या / 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणा-या मिळकतीस तसेच संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा, अविवाहीत शहीद सैनिकांचे नामनिर्देशितांचे मालमत्तांना मागील वर्षी सवलतींचा लाभ दिला आहे. त्यांच्याकडून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर संबंधितांचा प्राप्त होणा-या अर्जाच्या अधीन राहून त्यांना चालू वर्षाकरिता संगणक प्रणालीमध्ये सवलतीचा ‘फ्लॅग’ जनरेट करुन सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सन 2020-21 करीता महापालिकेने केलेली करवाढ करु नये अशी सुचना आयुक्तांनी केली असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. लॉकडाऊनचे कालावधीमध्ये विभागीय कार्यालयाकडील कॅश काऊंटर दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरुन कराचा ऑनलाईन भरणा करणेची सुविधेचा वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, ”जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला जगभरात पसरलेल्या साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. पिंपरी-चिंचवड कामगारांची नगरी आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बंध झाले आहेत. शहरातील नागरिकांना महापालिका स्तरावरून दिलासा देणेच्या दृष्टीने मिळकत करामध्ये सवलत देण्यात येत आहे”.

आपली प्रतिक्रिया द्या