गावात अडकलेल्या वृद्ध दांपत्याची एका ट्विटने झाली सुटका, पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक

कोरोना व्हायरसने देशात हातपाय पसरु नयेत आणि याचे संक्रमण होवू नये यासाठी केंद्र सरकारने सलग १४ एप्रिल पर्यंतचे लॉकडाऊन केल्याने संगमेश्वर तालुक्याच्या कोंड उमरे या ग्रामीण भागात पुणे येथील एक दांपत्य अडकून पडले होते. या वृध्द जोडप्याची गैरसोय सामना ऑनलाईनच्या प्रतिनिधीच्या कानावर आली. या जोडप्याला मदत व्हावी म्हणून सामना ऑनलाईनच्या ट्विटर हँडलवरून रत्नागिरी पोलिसांना मदतीसाठी एक ट्विट करण्यात आले. या ट्विटची तत्काळ दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी हालचाल केली आणि पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या मदतीने गावामध्ये अडकलेल्या जोडप्याची पुण्याकडे रवानगी केली.

परिस्थिती गंभीर असते तिथे पोलीस खंबीर असतात याचा प्रत्यय शनिवारी आला. संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे गावामध्ये अशोक विठ्ठल पवार (रा.पुणे) आपल्या पत्नीसह आले होते. इथे त्यांचे घर असून ते होळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे त्यांच्या गावी आले होते. कोंड उमरे हा तसा म्हणायला गेला तर दुर्गम भागच आहे. होळीनंतर पालखी घरी येवून गेली आणि परत पुण्याला जाणार तोपर्यंत देशात कोरोनाच्या प्रसाराचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे हे दांपत्य गावातच अडकून पडले होते. पवार दांपत्याला तीव्र स्वरूपातील मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी गरजेपुरता काही दिवसांच्या औषध साठा सोबत आणला होता. गावाकडचे घर अन्यवेळी बंद असल्याने घरात जीवनावश्यक वस्तूंचा साठाही नव्हता . त्यातच मोबाईलला रेंज नसल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती . पवार यांची अडचण समजताच फणसवणे येथील सामाजिक कार्यकर्ते सत्यवान विचारे यांनी शुक्रवार पासून स्वतः त्यांच्या घरी जावून त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या होत्या . याबरोबरच त्यांची औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते . यासाठी संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात,डॉ . अमित ताठरे , लायन्स क्लबचे अमोल पाटणे आदींनी प्रयत्न सुरु केले होते . एवढ्यातच शनिवारी सामना ऑनलाईन आवृत्तीकडे याबाबत मदतीसाठी फोन येताच सामनाकडून जिल्हा पोलीसांना एक ट्विट करण्यात आले .

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रवीण मुंढे यांनी या ट्विटची तातडीने दखल घेऊन संगमेश्वरचे पोलीस निरिक्षक उदयकुमार झावरे यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या दांपत्याला पुण्याला जायचे होते, मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या असल्याने आणि संचारबंदी लागू केली असल्याने दांपत्याला परत पुणे गाठणे अवघड झाले होते. पोलीस निरिक्षक झावरे आपले सहकारी मसुरकर,मांडके, भाऊ मोहिते यांच्यासह कोंड उमरे येथे गेले तेव्हा या दांपत्याने आपली अडचण त्यांच्या कानावर घातली. यानंतर पोलिसांनी या दांपत्याला संगमेश्वर पोलीस स्टेशनला आणले आणि पुणे येथे जाण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली. यानंतर संगमेश्वर येथील बाबू चिचकर यांची सुमो गाडी उपलब्ध करुन दिली. पोलिसांनी अत्यंत वेगाने या सगळ्या हालचाली केल्या. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या