नगर जिह्यात विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

कोरोनाचे सावट कायम असून, या सावटातच आज शाळा सुरू झाल्या. शहरासह जिह्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दाखविला, तर विद्यार्थ्यांचाही अल्प प्रतिसाद दिसून आला आहे. जिह्यात 1 हजार 200 शाळा असून, त्यातील 350 शाळा सुरू होतील, असा शिक्षण विभागाचा अंदाज होता. मात्र, यातीलही अनेक शाळांनी आज नकारघंटा वाजविली. नगर शहरात 79 शाळा असून, 35 शाळांनी मनपाला होकार कळविला होता.

शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्यांची स्वच्छता, सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर, पालकांचे संमतीपत्र, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोना तपासणी यांसह कोरोना नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी स्वच्छता मोहीम राबविली होती. आज सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळा व्यवस्थापनाने संमतीपत्र भरून घेतले होते. विद्यार्थ्यांची वर्गात 20 ते 25 टक्के उपस्थिती दिसून आली.

शहरात 79 शाळा असून, त्यातील 35 शाळांनी होकार दिला होता. शाळांच्या तयारीसंदर्भात पाहणी करण्यासाठी 25 पर्यवेक्षक व 7 सुपरवायझर्सची नियुक्ती केली आहे. शाळांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्राधिकरण म्हणून पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल.- श्रीकांत मायकलवार, मनपा आयुक्त.

जिह्यात एकूण 1200 शाळा असून, त्यातील 350 शाळा सुरू करण्याचे नियोजन होते. अनेक शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचाही अल्प प्रतिसाद आहे. कर्जत तालुक्यात 18 शाळा सुरू होणार होत्या. मात्र, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण न झाल्याने प्रत्यक्षात दोनच शाळा सुरू
झाल्या आहेत.- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

9 हजार शिक्षकांच्या चाचण्या बाकी

शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोना तपासणी बंधनकारक केली होती. जिह्यात सुमारे 16 हजार शिक्षक आहेत. त्यातील आजअखेर 7 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाल्याची नोंद माध्यमिक शिक्षण विभागाकडे झाली आहे. उर्वरित शिक्षकांच्या कोरोना चाचण्या बाकी आहेत.

सांगली जिह्यात 15 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती 750 पैकी 384 शाळा भरल्या

जिह्यातील 750 शाळांपैकी 384 शाळांची घंटा आज वाजली. गुगल लिंकवर नोंदणी केलेल्या 90 हजार विद्यार्थ्यांपैकी 15 हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. उर्वरित विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. शाळेत कोरोना आचारसंहितेचे पालन करूनच मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक विद्यार्थ्याकडे पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेस उपस्थिती बऱयापैकी होती. सांगली शहरात संथगतीने पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने अनेक पालकांनी संमतीपत्र शाळेकडे दिलेले नव्हते. त्यामुळे शहरातील बहुतांशी शाळांमध्ये तुरळकच विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे चित्र होते. जिह्यात नववी ते बारावीचे 1 लाख 47 हजार विद्यार्थी असून, 62 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांचे ऑनलाइन संमतीपत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते.

जिह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 750 शाळा आहेत. त्यापैकी 500 शाळांनी शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन माहिती भरली आहे. त्यापैकी 384 शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असून, शाळा सुरू होण्याचे प्रमाण 77 टक्के आहे. शिक्षण विभागाकडे जिह्यातील 90 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संमतीपत्र सादर केले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती दर्शविली. शाळांमध्ये उपस्थितांचे प्रमाण 18 टक्के राहिले. शाळेच्या दुसऱयादिवशी उर्वरित विद्यार्थी प्रवेश करणार आहेत. नववी ते बारावीचे 5 हजार 783 शिक्षक असून, त्यापैकी 3 हजार 188 जणांची कोरोना चाचणी झाली, तर 2 हजार 673 शिक्षकेत्तर कर्मचारी असून, त्या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱयांमध्ये आत्तापर्यंत 30 जण बाधित आढळले आहेत. उर्वरित शिक्षकांची कोरोना चाचणी घेतली जात असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या