तुळजापूर : कोरोनाचा रिपोर्ट येण्यापूर्वी अंत्यविधी उरकला, सरकारी रुग्णालयाचा संतापजनक प्रकार

637
death

कोरोना चाचणीचा रिपोर्ट येण्यापूर्वी मुलाचा परस्पर अंत्यविधी केल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापुरात घडला आहे. या मुलाला दम्याचा त्रास होता आणि त्याला अत्यवस्थ वाटायला लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या या अक्षम्य प्रकारामुळे मुलाचे पालक हे संतापले असून त्यांनी याबाबत तुळजापुरच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.

16 वर्षाच्या मुलाला दम्याचा त्रास होत असल्याने रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी त्याचा मृत्यू झाल्याचे कळाले होते. या मुलाची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. चंचला बोडके यांनी चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तर मुलाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या हवाली करावा असे निर्देश दिले होते. मात्र रिपोर्ट येण्याअगोदरच मंगळवारी नातेवाईकांना माहिती न देता सदर मुलाचा अंत्यविधी करण्यात आल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी डॉ. चंचला बोडके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे प्रतिक्रिया मिळू शकली नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या मुलाचे तोंड आम्हाला पाहता आले नाही, रिपोर्ट येण्याअगोदर मोबाईल वरून सूचना देण्याचा शब्द डॉक्टरांनी दिला होता. मात्र मंगळवारी आमच्या परस्पर अंत्यविधी करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया मुलाच्या वडिलांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या