संभाजीनगरात जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

ग्रामीण भागात सर्दी, खोकला आणि ताप असलेले रूग्ण खासगी डॉक्टरकडे जाऊन स्वत:चा उपचार करवून घेतात.ही कोरोना आजाराची लक्षणे असल्याने अशा रूग्णांची माहिती ग्रामीण रूग्णालये व जिल्हा रूग्णालयास खासगी डॉक्टरांनी कळवावी, अशा सूचना खासगी डॉक्टरांना करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांनी ही सूचना केली होती. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली होती.

संभाजीनगरच्या जिल्हा परिषद इमारतीत गुरुवारी स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीसाठी प्रत्येक सदस्याने आपापल्या तालुक्यातील गावात राहून सहभाग घेतला. प्रत्येकाने आपापल्या मोबाईलमधील मिटिंग अ‍ॅपचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापर केला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगच्या उद्देशाने या मार्गाने बैठक घेण्यात आली. अशा पध्दतीने स्थायी समितीची सभा घेणारी ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.

स्थायी समितीत जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे कोरोनाचा प्रतिबंध कशा प्रकारे केला जात आहे? औषधी पुरवठा, पीपीई कीट, मास्क पुरवठा, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 20 हजार रूपये प्रमाणे पुरवण्यात आलेला निधी, खासगी डॉक्टरकडे जाणाऱ्या कोरोनासदृष्य लक्षणे असलेल्या रूग्णांची नोंदणी, ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेली फवारणी, जिल्ह्यातील चेकपोस्टवर ग्रामसेवकांच्या झालेल्या नियुक्त्या, लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील मजुरांना तातडीने उपलब्ध करावून द्यायची कामे या विषयावर चर्चा करून आढावा व निर्णय घेण्यात आला.

स्थायी समिती बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातून, सभापती किशोर बलांडे, वित्त व बांधकाम सभापती पाथ्रीकर यांनी फुलंब्री येथून, आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या दालनातून, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड यांनी हनुमंतखेडा येथील निवासस्थानातून, मधुकर वालतूरे यांनी पंचायत समिती गंगापूर येथुन, किशोर पवार यांनी पंचायत समिती कन्नड येथुन, केशव तायडे यांनी पंचायत समिती सिल्लोड येथुन तर रमेश गायकवाड, पंकज ठोंबरे, रमेश पवार, जितेंद्र जैस्वाल यांनी स्वतःच्या निवासस्थानी राहून बैठकीत सहभाग नोंदवला.

आपली प्रतिक्रिया द्या