पतंजलीच्या ‘कोरोनील’बाबत तज्ज्ञांना काय वाटतं ?

पतंजलीने कोरोनावर रामबाण इलाज असल्याचा दावा करत ‘कोरोनील’ हे औषध बाजारात आणले आहे. औषधाच्या लाँचिंग कार्यक्रमात बोलताना योगगुरू बाबा रामदेव यांनी या औषधाबद्दल आणि आमच्या दाव्याबद्दल असलेल्या सगळ्या शंकाचे आमच्याकडे उत्तर आहे असं म्हटलं आहे. हे औषध आणि त्याबाबतचे बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यांबाबत आयुर्वेदाचे प्रसिद्ध डॉक्टर परीक्षित शेवडे यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिक्रियेदरम्यान ते म्हणाले की ‘वैद्य म्हणून मी औषधाचे स्वागत करतो मात्र कोणत्याही संशोधनाची एक प्रक्रिया असते, आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी दावा करणं मला थोडं अवघड वाटतं’

डॉ. शेवडे यांना या वृत्तासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, आयुर्वेदात काहीही ब्रँडेड नसतं. कोणतंही औषध किंवा त्यातले घटक हे ग्रंथोक्तच असतात. नवीन कोणतंही औषध बनवलं, तर त्याचं संयुग हे देखील ग्रंथोक्त असतं. आतापर्यंत कोरोनासाठी आयुर्वेदात जितकं संशोधन आणि चाचण्या झाल्या त्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात ज्या चाचण्या करण्यात आल्या, त्याचं यशस्वी होण्याचं प्रमाण जवळपास 96 टक्के इतकं आहे. त्यामुळे अशा प्रकारची औषधं लागू पडण्याचं प्रमाण नक्कीच असू शकतं. संशोधनाच्या माहितीत शंभर टक्के सत्यता असणं गरजेचं आहे. एखाद्या संशोधनाची सर्वसामान्य प्रक्रिया असते. आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांसमोर दावा करणं हे वैज्ञानिक शिष्टाचाराला धरून नाही असं मत डॉ. शेवडे यांनी व्यक्त केलं आहे.

एकिकडे शास्त्रज्ञ लस किंवा शोधण्याचा प्रयत्न करत असताना ग्लेन्मार्क आणि आजच्या घटनेकडे तुम्ही कसे बघता? या प्रश्नावर डॉ. शेवडे म्हणाले की, आता यात विस्ताराने सांगेन. आयुर्वेद मुळात कोविडकडे कोरोना व्हायरस या पद्धतीने बघणारच नाही. आयुर्वेदाच्या या बाबतीतल्या संज्ञा, निदान पद्धती स्वतंत्र आहेत. आजघडीला बहुसंख्य वैद्यांच्या निदानानुसार, कोविड ही व्याधी आयुर्वेदाच्या ‘वातश्लेष्मज’ ज्वर या निदानात मोडतो. त्यानुसार त्याची चिकित्सा होऊ शकते. मग उपचारांनी लोकांना किती आराम पडला, याची उत्तर भविष्यात मिळत जातील. पण, त्यासाठी खूप संशोधन आवश्यक आहे. ते सर्व होईपर्यंत तसेच त्याविषयीची संशोधन अहवाल जाहीर होईपर्यंत अशी जाहीर विधानं होऊ नयेत, असं डॉ. शेवडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी स्वतः अमेरिकेतील जितक्या रुग्णांवर उपचार केले, ते सर्व बरे झाले आहेत. तरीही आपण असा कोणताही दावा केला नव्हता. कारण ते संशोधक म्हणून योग्य नसतं. ग्लेनमार्क कंपनीने कोरोना बरा करण्यासाठीच्या गोळ्या बाजारात आणल्या आहे. याबाबत विचारले असता शेवडे म्हणाले की लक्षणे दिसत नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले असे दोन्ही प्रकारचे रुग्ण आयुर्वेदीक उपचारांनी बरे होत असल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. दुसरीकडे, अशा ग्लेनमार्कसारख्या कंपन्यांनी आणलेल्या औषधांची किंमत ही जवळपास 12,566 च्या घरात जाते आहे. त्याच्या निम्म्या किमतीत जर आयुर्वेदाकडून रिझल्ट मिळत असतील, तर तो आपल्यासाठी सर्वात प्रथम पर्याय असला पाहिजे. कोविडच्या माध्यमातून सुरू झालेलं जागतिक राजकारण आणि अर्थकारण याकडे सामान्यांनी सुज्ञपणे बघणं आणि योग्य-अयोग्य याचा निर्णय घेणं उचित आहे. त्यानुसार जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढे जाणं योग्य ठरेल. तसंच, सध्याच्या घडीला आयुर्वेदिक महाविद्यालयांनीही पुढे येऊन कोरोना रुग्णांवर त्यांच्या संमतीने उपचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अशी सुरुवात होऊ शकते. कारण, देशात सर्वाधिक आयुर्वेदिक महाविद्यालयं महाराष्ट्रात आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, गोवा अशा ठिकाणी हे सुरू झालं आहे. त्यात रुग्णांवर संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचं सिद्ध झाल्याचंही डॉ. शेवडे यांनी सांगितलं.

सर्वसामान्यांनी या परिस्थितीत काय केलं पाहिजे, या प्रश्नावर डॉक्टर शेवडे म्हणाले की, सध्या पावसाळा सुरू झाला आहे. हा साधारणपणे साथीच्या रोगांचा काळ आहे. प्रत्येक सर्दी-खोकला हा कोविड असेल असं जरूरी नाही. पण ताप किंवा खोकला लोकांनी अंगावर काढू नये. जवळच्या डॉक्टर अथवा वैद्याचा सल्ला घ्यावा. जोपर्यंत अधिकृत शासकीय यंत्रणांकडून कोणतीही घोषणा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवला जाऊ नये, असा सल्ला डॉ. परीक्षित शेवडे यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या