रखडलेल्या निवेदनांची माहिती नगरसेवकांना घरपोच मिळणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

पालिका महासभेत नगरसेवक त्यांच्या विभागातील तातडीच्या कामांसंबंधीची माहिती निवेदने देऊन पालिका प्रशासनाकडून घेत असतात. मात्र सभागृहात नगरसेवकांची संख्या मोठी असल्यामुळे काही वेळा त्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. नगरसेवक यासाठी सातत्याने पाठपुरावा करतात. तरीही काही वेळा महत्त्वाच्या विषयांची माहिती नगरसेवकांना मिळत नाही. मात्र आता अशा रखडलेल्या निवेदनांची माहिती नगरसेवकांना घरपोच देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शिवसेनेने यासाठी पाठपुरावा केला होता.

मुंबई मनपातील नगरसेवकांना सभागृह बैठकीच्या एक तास आधी पालिकेच्या तातडीच्या कामकाजाबाबत निवेदन देऊन माहिती घेता येते. पालिकेच्या नियमांनुसार नगरसेवकांना एकाच बैठकीत दोनपेक्षा अधिक बाबींवर अशा प्रकारचे निवेदन देऊन माहिती घेता येत नाही. या वेळी दोनपेक्षा अधिक विषयांवर निवेदनाची मागणी आल्यास त्यावर महापौरांना सर्वाधिक तातडीच्या बाबींना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. पालिकेतील 232 नगरसेवकांच्या संख्येच्या तुलनेत दोन निवेदनांची मर्यादा अगदीच कमी आहे.

पालिकेत सुरुवातीला नगरसेवकांची संख्या खूप कमी होती. मात्र आता नगरसेवकांची संख्याही वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली होती. पालिका प्रशासनानेही याची योग्य ती दखल घेतली. या निर्णयामुळे नगरसेवकांना माहितीसाठी आता पाठपुरावा करावा लागणार नाही. पाचपेक्षा जास्त निवेदने आली तर त्याची माहिती घरपोच मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवकांचा वेळही वाचणार आहे-  अनंत नर, नगरसेवक

निवेदनांची संख्या पाच झाली 

पालिका महासभेत एका नगरसेवकाला दोनपेक्षा जास्त निवेदने देता येत नाहीत तसेच सादर केलेल्या सर्वच निवेदनांवर पालिकेकडे उत्तरे तयार नसतात तर महापौरांनी प्राधान्य दिलेली दोन निवेदने वगळता अन्य सर्व नोटीस रद्द होतात. त्यामुळे नगरसेवकांचा वेळ फुकट जातो आणि माहितीही मिळत नाही. ही उत्तरे मिळत नसल्याने नगरसेवकांना सतत ते प्रश्न मांडावे लागतात. त्यामुळे पालिकेच्या नियमात असलेली सध्याच्या दोन निवेदनांची संख्या वाढवून पाच करावी आणि पाचपेक्षा जास्त निवेदने आल्यास त्यातील माहिती नगरसेवकांना परस्पर घरी पाठवावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अनंत नर यांनी 4 डिसेंबर 2019च्या महासभेच्या बैठकीत केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या