
सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या कॅण्टीनमध्ये नकली कुपन्सच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात कॅण्टीनमधील मेस बॉयसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम जाधव, सोलमन उर्फ सुलेमान पंडीत, अमोल सूर्यवंशी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 78 हजार रुपयांची नकली कुपन्स जप्त करण्यात आली आहेत.
कंपनीत पाच हजारांवर कामगार काम करत असून त्यांच्यासाठी कंपनीच्या आवारात कॅण्टीन आहे. त्यासाठी कामगारांना कुपन्स दिली जातात. मात्र कंपनीच्या नेहमीच्या प्रिंटर्समधून कुपन्सची छपाई होत नसल्याने प्रिंटरमालकाने कंपनीशी संपर्क साधून कुपन्स छपाईचे काम दुसऱ्या कुणाला दिले आहे का याबाबत विचारणा केली. दुसऱ्याला काम दिले नसतानाही कुपन्स कोण छापून देतो, असा प्रश्न निर्माण झाल्याने कंपनीने उल्हासनगर ठाण्यात धाव घेऊन चौकशीची मागणी केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) लक्ष्मण कांबळे, उपनिरीक्षक दीपक यादव यांनी प्रेस बाजारात झाडाझडती घेऊन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.