कारागृहात कारपेंटरचे काम करत नाही म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी एका कैद्याला फर्लोची सुट्टी नाकारली होती. त्याविरोधात या कैद्याने उच्च न्यायालयात याचिका केली होती. ही याचिका मंजूर करत न्यायालयाने कैद्याला फर्लोची रजा दिली.
दशरथ देबूर, असे या कैद्याचे नाव आहे. त्याला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून तो कारागृहात आहे. त्याने फर्लो रजेसाठी अर्ज केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्याला सुट्टी नाकारली. विशेष महानिरीक्षकांच्या सुट्टी नाकारण्याच्या आदेशाला देबूरने आव्हान दिले.
न्या. विनय जोशी व न्या. वृषाली जोशी यांच्या नागपूर खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. कारागृहातील वर्तन बघून पैद्याला फर्लो रजा दिली जाते. देबूर कारपेंटरचे काम करत नव्हता. परिणामी त्याला रजा नाकारण्यात आली, असा युक्तिवाद कारागृह प्रशासनाने केला.
मात्र कारपेंटरचे काम करत नाही या कारणासाठी फर्ले रजा नाकारली जाऊ शकत नाही. न्यायालयानेही रजा मंजूर करावी, अशी मागणी देबूरच्या वतीने करण्यात आली. तसेच यापुढे मी कारपेंटरचेही काम करेन, अशी हमीदेखील देबूरने दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने देबूरची मागणी मान्य केली.