‘कोव्हिशिल्ड’पुढे कोरोना भिरभिरला, दोन्ही डोस घेतलेल्यांना संसर्गाचा धोका तब्बल 93 टक्क्यांनी कमी

‘कोव्हिशिल्ड’पुढे कोरोना निष्प्रभ ठरला आहे. या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संसर्गाचा धोका तब्बल 93 टक्क्यांनी कमी होतो, असा दिलासादायी निष्कर्ष लसीकरणासंबंधित सर्वात मोठय़ा सर्वेक्षणातून काढला आहे. देशात लसीकरणानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ 1.6 टक्के आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या एक हजार लोकांपैकी 16 जणांनाच पुन्हा कोरोना होऊ शकतो, असे या सर्वेक्षणात आढळले आहे.

देशाच्या सशस्त्र बलांतील 15 लाख 95 हजार 630 आरोग्यसेवक व प्रंटलाइन वर्कर्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात कोव्हिशिल्डची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. कोव्हिशिल्ड ही देशाच्या कोरोना लसीकरण मोहिमेतील प्रमुख लस आहे. या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ 7 टक्के संसर्गाचा धोका उरत आहे. चंदिगडच्या ‘पीजीआय’ने हा अभ्यास केला. यातील निष्कर्ष ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झाले आहेत. हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण असल्याचा संशोधकांचा दावा आहे. आतापर्यंत 10 लाखांहून कमी नमुन्यांचा अभ्यास केला गेला होता. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरिएंटने कहर केला होता. त्याचवेळी हे सर्वेक्षण केले होते, असे ‘निती’ आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले. 135 दिवस चाललेल्या या सर्वेक्षणातील निष्कर्षांनी लसीबाबत संभ्रमात असलेल्या लोकांचे टेन्शन दूर केले आहे.

गंभीर परिणाम रोखण्यासाठी लवकरात लवकर लस घ्या!

कोरोना लढय़ात लस हेच एकमेव शस्त्र आहे. लसीकरणच संसर्गाचा धोका कमी करू शकते. कुठलीही लस संसर्ग न होण्याची पूर्णपणे हमी देत नाही, परंतु संसर्गाचे गंभीर परिणाम होण्यापासून संरक्षण करते. त्यामुळे लसीवर विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर लस घ्या. तसेच लसीकरणानंतरही कोरोना नियमावलीचे पालन करा, असे आवाहन ‘निती’ आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केले आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवडय़ांनंतर ती व्यक्ती पूर्णपणे लसीकरण केलेली व्यक्ती मानली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

लस न घेतलेल्यांना संसर्ग व मृत्यूचा धोका अधिक

  • सर्वेक्षणात सहभागी लोकांपैकी लस न घेतलेल्या 10,061 लोकांना कोरोना झाला, तर लसीचा एक डोस घेतलेल्या 1,159 आणि दोन डोस घेतलेल्या 2,512 लोकांना संसर्ग झाला.
  • मृत्यूचे प्रमाणही लस न घेतलेल्या लोकांमध्ये अधिक आढळले. लस न घेतलेल्या 37 लोकांचा मृत्यू झाला, तर एक डोस घेतलेल्या 16 जणांना आणि दोन डोस घेतलेल्या 7 जणांना कोरोनाशी लढा देताना प्राण गमवावा लागला.
  • कोविड उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणारे जवळपास 87.5 टक्के रुग्ण हे लस न घेतलेले असतात.
आपली प्रतिक्रिया द्या