महाराष्ट्र सरकारने गाईला काही दिवसांपूर्वीच राज्यमातेचा दर्जा दिला. पण गाईचा मृतदेह उचलण्यासाठी निघालेली गाडी मोदींच्या रविवारी झालेल्या ठाण्यातील सभेमुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे गाईला राज्यमातेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे तिच्या मृतदेहाकडे दुर्लक्ष करायचे अशी सरकारची दुटप्पी भूमिका यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
पशुसंवर्धन अधिकाऱ्याची कबुली
काशिमीरा येथे 4 ऑक्टोबर रोजी सकाळी रस्त्याच्या कडेला एका गाईचा मृत्यू झाला. पण मीरा-भाईंदर महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक महापालिकेची गाडी त्वरित तेथे पोहोचून गाईचा मृतदेह तत्काळ उचलण्याची आवश्यकता होती. मात्र दुसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबरपर्यंतदेखील त्या गाईचा मृतदेह तसाच पडून होता.
महापालिकेने तत्परता दाखवली असती तर मृतदेहाची हेळसांड झाली नसती. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाण्यात जाहीरसभा होती. त्या पाश्र्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. काशिमीरातदेखील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिकमुळे पालिकेची गाडी वेळेत पोहोचू शकली नाही, अशी कबुली पालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी विक्रम नराटले यांनी दिली. बऱ्याच वेळानंतर गाडी घटनास्थळी गेली व उशिराने गाईचा मृतदेह उचलला.