Sitaram Yechury passes away – सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

छातीत न्युमोनियासदृश संसर्ग झाल्याने येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स  रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

सीताराम येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस होते. 1974 साल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)मध्ये प्रवेश केल्यानंतर वर्षभरातच येचुरी सीपीआयएममध्ये सामील झाले. 1992 पासून ते सीपीआयएमच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. 2005 ते 2017 या काळात त्यांनी पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर खासदार म्हणून कार्य केले.

सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी आंध्र प्रदेशमधील राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता म्हणून कार्यरत होते. तर त्यांची आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या.

प्राथमिक शिक्षणानंतर येचुरी यांनी दिल्लीतील प्रेसिडेंट्स एस्टेट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ते बोर्डात पहिले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी मिळवली आणि त्यानंतर जवाहलाल नेहरू विद्यापीठातून एम.ए. पूर्ण केले. आणीबाणीमध्ये त्यांना अटकही झाली होती.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स अकाऊंटवरून ट्विट करत सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली वाहिली.