
पुण्यातील मोशीतील विनायकनगर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या 100 फुटी पुतळ्याच्या अवशेषाला प्रवासातच तडे गेल्याची धक्कादायक कबुली कार्यकारी अभियंत्यांनी सोमवारी (दि.2) दिली. त्यामुळे पुतळ्याच्या अवशेषाला तडे गेले नसल्याचा चुकीचा खुलासा करणारे आयुक्त शेखर सिंह हे तोंडघशी पडले आहेत. तर, प्रशासनाने ठेकेदार आणि सल्लागाराला नोटीस दिली आहे.
मोशी, बोऱ्हाडेवाडीतील विनायकनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फूट उंच ब्राँझमधील पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. याचे काम धनेश्वर कस्ट्रक्शनला देण्यात आले आहे. या ठेकेदाराने पुतळ्याचे काम शिल्पकार राम सुतार यांना दिले आहे. दिल्लीत पुतळ्याचे अवशेष तयार करण्यात येत आहेत. पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन आयआयटी मुंबई यांचे मंजूर संरचनेनुसार करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत पुतळ्याचे 80 टक्के अवशेष मोशीत आणण्यात आले आहेत. या प्रवासातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोजडीला तडे गेल्याची कबुली कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी दिली.