चाकरमान्यांचा लोकल खोळंबा कोपरजवळ ऐन गर्दीच्यावेळी रेल्वे रुळाला तडा

सामना ऑनलाइन ,डोंबिवली

ऐन सकाळी गर्दीच्यावेळी कोपर-दिवा स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱया मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. सुदैवाने मोटरमनच्या सतर्कतेमुळे  मोठी दुर्घटना टळली. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सुमारे अर्धा तास एकापाठोपाठ एक लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या. कामावर जाण्याच्या घाईगडबडीत असलेले चाकरमानी लोकलमध्ये खोळंबल्याने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी अनेकांच्या हजेरीपटावर लेटमार्क लागला.

 प्रवाशांचा घामटा निघाला

आधीच उकाडा त्यात श्वास घेण्यासाठीही लोकलच्या डब्यात जागा नसल्याने प्रवाशांचा यावेळी घामटा निघाला. तर दुसरीकडे धिम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्याने डोंबिवलीकरांना या फलाटावरून त्या फलाटावर पोहोचण्यासाठी भागमभाग करावी लागली.

डोंबिवलीहून सकाळी आठच्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेली सीएसएमटी धिम्या लोकलने कोपर स्थानक सोडल्यानंतर शंकर मंदिराजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ लोकल थांबवून रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्यानंतर अभियंता व गँगमनने दुरुस्ती कामाला सुरुवात केली. 8.43 वाजता रेल्वे रुळाची दुरुस्ती पूर्ण झाली. मात्र यादरम्यान धिम्या मार्गावर लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर  डोंबिवली ते ठाणे स्थानकादरम्यानची वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली. त्यामुळे सकाळी सुमारे 20 ते 25 मिनिटे लोकल उशिराने धावत होत्या. केवळ ठाणे पल्ल्याडच नव्हे तर या लोकल खोळंब्यामुळे मुलुंड, विक्रोळी, घटकोपर, कुर्ला आदी ठिकाणी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली तर मुंब्रा, कळवादरम्यान जलद लोकल थांबत नसल्याने येथील प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे एकंदरीतच आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी कामाधंद्यावर निघालेल्या चाकरमान्यांना ऐन गर्दीच्यावेळी प्रचंड मनस्ताप झाला.