
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रेसाठी आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी मुख्य मंदिर परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला. अतिक्रमण काढण्याची कारवाई कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
यात्राकाळात आलेल्या भाविकांना अतिक्रमणांमुळे अडचण येत होती. तसेच वाहतूककोंडी होत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या वेळेसचा यात्रा महोत्सव 2 मार्च ते 19 मार्च या कालावधीत होणार असल्याने, भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी ही मोहीम राबवण्यात आली.
कारवाईवेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, सरचिटणीस माधुरी मरकड, विश्वस्त उत्तम मरकड, दादासाहेब मरकड, रवींद्र आरोळे, कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांच्यासह पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, लक्ष्मण पवार उपस्थित होते. तसेच या कारवाईत होमगार्ड आणि देवस्थानच्या कर्मचाऱयांनीही सहभाग घेतला.
अतिक्रमण काढण्यापूर्वी पोलिसांनी अतिक्रमणधारकांना रीतसर नोटिसा बजावल्या होत्या. या नोटीसमध्ये यात्रा कालावधीत मढी-पाथर्डी रोडवर दुकाने, हातगाडय़ा लावून अतिक्रमण केले असून, ट्रस्टच्या सूचनांचे पालन न केल्याने कारवाई करण्यात येईल, तसेच अतिक्रमणामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास दखलपात्र गुन्हा नोंदवला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. या नोटिसा देऊनही काहींनी अतिक्रमणे न काढल्याने अखेर कारवाई करण्यात आली.

























































