पाक महिलेशी लग्न करणारा जवान बडतर्फ; सीआरपीएफची कारवाई

केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफने कोणतीही माहिती न देता पाकिस्तानी महिलेशी लग्न करणाऱ्या जवानाला बडतर्फ केले आहे. मुनीर अहमद या जवानाने पाकिस्तानी महिलेसोबतचे लग्न इतरांपासून लपवून ठेवले होते. त्याची कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे आढळल्याने सीआरपीएफने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. गेल्या वर्षी 24 मे रोजी व्हिडीओ कॉलद्वारे मुनीर अहमद आणि मेनल खान यांचे लग्न झाले.

मुनीर अहमदला पाकिस्तानचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीशी आपले लग्न लपविल्याबद्दल आणि तिच्या व्हिसाच्या वैधतेच्या पलीकडे तिला जाणूनबुजून आश्रय दिल्याबद्दल सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सीआरपीएफचे प्रवक्ते उपमहानिरीक्षक एन दिनकरन यांनी याला दुजोरा देताना मुनीरचे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे म्हटले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या राजनैतिक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले. त्यानंतर अहमदचे मेनल खानसोबतचे लग्न उघडकीस आले.