मॅच फिक्सिंग करणाऱ्यांना फासावर लटकवा- जावेद मियांदाद याची मागणी

स्फोटक फलंदाजीमुळे क्रिकेटविश्वात नाव कमावणारा जावेद मियांदाद सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने म्हटलंय की क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराला थारा देता कामा नये. जो क्रिकेटपटू फिक्सिंग करेल त्याला एकच शिक्षा झाली पाहिजे ती म्हणजे फाशीची. स्पॉट फिक्सिंग हा हत्येइतकाच गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्यासाठी फाशी हाच एक शिक्षेचा मार्ग असू शकतो असं त्याने म्हटलंय.

मियाँदाद आता 62 वर्षांचा झाला असून त्याने त्याच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय की ‘जो फिक्सिंग करतो तो त्याच्या घरच्यांना धोका देत असतो. ही अशी लोकं असतात जी स्वत:च्या घरच्यांचीही एकनिष्ठ नसतात. फिक्सिंगमध्ये सामील असणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे आणि त्यातून लोकांना आनंद मिळत असतो. म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणालाही माफ करू नये’ मियांदाद याने म्हटलंय की ‘फिक्सिंग करून पैसा कमावतात आणि नंतर माफी मागतात, कोणी चूक केली असेल तर तो माफी मागणारच ना ?अशा लोकांना कठोर शिक्षा करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पायंडा घालणं गरजेचं आहे. माणुसकीला नुकसान पोहचवेल असा व्यक्तीला या जगात राहण्याचा अधिकार नाहीये’

पाकिस्तानी क्रिकेटपटू्ंवर सातत्याने सामना निश्चितीचे आरोप लावण्यात आलेले आहेत. ही प्रकरणे तडीस लावण्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अपयशी ठरलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीज याने फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्यांना पुन्हा संघात स्थान देऊ नये अशी मागणी केली होती. यावर मियाँदादने त्याचे मत व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या