Crime news – ड्रग्ज तस्करांचा पोलीस पथकावर तलवारी, चॉपरने हल्ला; सहाजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तलवारी, चॉपर, हॉकी स्टिकने ड्रग्जमाफिया टोळीने मानखुर्द पोलीस पथकावर सशख हल्ला केल्याचा भयंकर प्रकार उलवे येथे घडला आहे. या हल्ल्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आठजणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी होणार असल्याची माहिती मुंबईतील मानखुर्द पोलिसांना मिळाली. त्यानुसार झोन ६ मधील पोलीस पथक उलव्यात दाखल झाले. पोलीस पथकाने सेक्टर १९ मधील एका हॉटेलजवळ सापळा रचला. मात्र पोलीस आल्याची कुणकुण ड्रग्जमाफियांना लागली. सावध झालेल्या या टोळीने आपल्या साथीदारांनाही त्याठिकाणी बोलावले व थेट पोलीस पथकावर तलवारी, चॉपर, हॉकी स्टिक आणि काठ्यांनी हल्ला केला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मंधारे यांच्यासह तीन कर्मचारी आणि तीन नागरिक जखमी झाले आहेत.

तीन पथके तैनात

हल्ल्यानंतर ड्रग्ज तस्कर घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात आठ ड्रग्ज तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके रवाना केली आहेत. मानखुर्द पोलीस पथकाने उलवे पोलिसांनी या कारवाईबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात असून दोन-तीन दिवसांतच आरोपींना ताब्यात घेऊ, अशी माहिती उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणे यांनी दिली.