
भिवंडी शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तीन दिवसांत पाच अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून त्यात तीन मुलींचा समावेश असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बेपत्ता झालेली सर्व मुले 11 ते 17 वर्षे वयोगटातील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता झालेली पाचही मुले शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी आहेत.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिराणीपाडा परिसरात राहणारा 15 वर्षीय मुलगा मो. सादिक अन्सारी हा कोणालाही न सांगता घरातून निघून घेला त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नाही. अखेर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. तर दुसरीकडे नागाब परिसरात राहणारा 17 वर्षीय मोहम्मद फैज उर्फ आयन खान हा कॉलेजला जाण्यासाठी सकाळी सात वाजता घरातून बाहेर निघाला आणि घरी आलाच नाही. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
तीन मुलींचे अपहरण
गैबीनगर परिसरात राहणारी नबिहा अन्सारी (11) व तिची मैत्रीण अल्फिया अन्सारी (16) या दोघी रात्री आठ वाजता घराबाहेर गेल्या होत्या. तर त्याच परिसरात राहणारी झोया अन्सारी (17) कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर निघाली होती. मात्र या तिघीही रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.