गुजरातमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून मुलानेच आईचा खून करत Instagram वर स्टोरी शेअर केली. आजारी असणाऱ्या आईशी सतत होणाऱ्या वादातून मुलाने टोकाचं पाऊल उचलत आईचा खून केला आहे. त्यानंतर काहीच सेकंदात मुलाने इन्स्टाग्रामवर Sorry mom, i killed you, i miss you, om Shanti असं लिहीत आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.
गुजरातच्या राजकोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 48 वर्षीय ज्योतिबेन गोसांई या मानसिकदृष्ट्या आजारी होत्या. त्यामुळे मुलामध्ये आणि आईमध्ये सतत वाद होत होता. याच कारणामुळे त्याने आईची हत्या केली. आरोपी मुलाचे नाव निलेश (21) असून त्याने स्वत: फोन करत आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. आईची हत्या केल्यानंतर त्याने सर्वप्रथम मित्राला याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना सांगितले. पोलिसांनी निलेशला तत्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिबेन गोसांई आणि मुलगा निलेश हे दोघेच घरात राहत होते. त्यांच्या पतीने 20 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. ज्योतीबेन या मानसिकदृष्ट्या आजारी होत्या. त्यामुळे त्यांचा मुलाशी सतत वाद होत होता. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी गोळ्या घेणे सुद्धा बंद केले होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव जास्त हिंसक झाला होता. याच कारणामुळे आरोपी निलेशने आईचा खून केला.