ऑपरेशन सिंदूरवर टीका; विद्यार्थिनी आहे म्हणून गुन्हा रद्द होणार नाही, हायकोर्टाने बजावले

ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱया 19 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. केवळ विद्यार्थीं आहे व परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. या कारणासाठी गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने बजावले.

मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हा गुन्हा गंभीर आहे. शिक्षण घेत असल्याची सबब लक्षात घेता जामिनासाठी विचार केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.

पुणे पोलिसांनी नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी या विद्यार्थिनीने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत टाकलेली पोस्ट सोशल मीडियावरुन लगेचच डिलिट करण्यात आली. या पोस्ट संदर्भात जाहीर माफीही मागितली आहे. तसेच विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. तेव्हा हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. ती अमान्य करत  न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली.

केस डायरी सादर करण्याचे आदेश

या विद्यार्थिनीविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुह्याची केस डायरी बंद पाकिटात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मुख्य सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांना दिले आहेत.