
अमेरिका, रशिया आणि चीननंतर हिंदुस्थानही आता स्टील्थ फायटर जेटची निर्मिती करणार आहे. हिंदुस्थानचे स्वदेशी पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट येत्या काळात झेप घेणार आहे. त्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ सज्ज झाली आहे. डीआरडीओने देशाचे पहिले अॅडव्हान्स मीडियम काॅम्बॅट (एएमसीए) प्रोटोटाईप बनवण्यासाठी तीन कंपन्यांना शॉर्टलिस्ट केले आहे.
डीआरडीओने अॅडव्हान्स मीडियम काॅम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए)चा प्रोटोटाईप बनवण्यासाठी, त्यासाठी बोली लावण्यासाठी सहा कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या आहेत. ज्यामध्ये एकूण तीन समूह आहेत. टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड ही कंपनी सर्वात मोठी दावेदार मानली जात आहे. याव्यतिरिक्त, लार्सन अँड टुब्रो -भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे कन्सोर्टिअम आणि भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड आणि डेटा पॅटनर्सच्या एका कन्सोर्टिअम यांचा समावेश आहे. अॅडव्हान्स्ड मीडियम काॅम्बॅक्ट एअरक्राफ्ट किंवा एएमसीए हे हिंदुस्थानचे पाचव्या जनरेशनचे स्वदेशी स्टील्थ फायटर जेट आहे. हे एक सिंगल सीट आणि दोन इंजिनचे मल्टिरोल फायटर जेट आहे. या लढाऊ विमानात अॅडव्हान्स्ड स्टील्थ कोटिंग असेल. स्टील्थचा अर्थ शत्रूंच्या अत्याधुनिक रडार सिस्टमलाही हे लढाऊ विमान दिसणार नाही.
अॅडव्हान्स मीडियम काॅम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) हे संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित, एआय आधारित को-पायलट, स्टेल्थ डिझाईन आणि सुपरक्रूझ तंत्रज्ञानासह हे विमान आधुनिक युद्धासाठी एक निर्णायक हत्यार ठरणार आहे.
या अत्याधुनिक फायटर जेटला स्वदेशी इंजिन बसवण्यासाठी आधीच फ्रांससोबत काम सुरू आहे.
हिंदुस्थानच्या वायुदलाला 2035 नंतर एएमसीए मिळतील. हिंदुस्थान 125 पेक्षा जास्त लढाऊ विमाने तयार करतील. एएमसीए प्रोजेक्ट प्रत्यक्षात साकार झाल्यानंतर हिंदुस्थान असा चौथा देश असेल, जो अत्याधुनिक फायटर जेटची निर्मिती करेल.
अमेरिकेचे एफ22 आणि एफ-35, रशियाचे एसयू-57 आणि चीनचे जे-20 पाचवे जनरेशनचे स्टील्थ फायटर जेट आहे.


























































