लाल किल्ल्यातून जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमातून सोने आणि हिऱ्यांनी जडलेला कलश चोरीला, शोध सुरू

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लाल किल्ला परिसरातून लाखो रुपयांचे हिर्‍याने जडवलेले सोन्याचा कलश चोरीला गेला आहे. लाल किल्ल्यात जैन धर्माचा एक कार्यक्रम सुरू होता. त्याच कार्यक्रमात कोट्यवधी रुपये किमतीचा कलश ठेवण्यात आला होता. त्याच दरम्यान चोरट्यांनी संधी साधून तो उचलून नेला. घटनेची माहिती मिळताच चौकशी सुरू करण्यात आली आहे. लाल किल्ला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ (CISF) चे जवान तैनात असतात.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक लाल किल्ल्यात जैन धर्माचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये हिर्‍याने जडवलेला 760 ग्रॅम सोन्याचा कलश ठेवण्यात आला होता. या मौल्यवान सोन्याच्या कलशावर चोरट्यांची आधीपासूनच नजर होती. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यावर हात साफ केला. लाल किल्ला हा हाय-सिक्युरिटी झोन आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. तरी देखील हा कलश चोरण्यात चोरांना यश आलं.

अंदाजे 1 कोटी रुपये किंमत
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात जैन धर्माच्या एका धार्मिक कार्यक्रमातून जवळपास 1 कोटी रुपये किमतीचा सोने व मौल्यवान दगडांनी जडवलेला कलश चोरीस गेला आहे. 760 ग्रॅम सोन्याच्या या कलशात 150 ग्रॅम हिरे, माणिक आणि पन्ने बसवलेले होते. हा कलश मंगळवारी झालेल्या कार्यक्रमादरम्यान गर्दीतून गायब झाला. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील उपस्थित होते.

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात जैन धर्मीय अनुयायांनी धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन केले होते. त्यात लाखो रुपयांचा कलश ठेवण्यात आला होता. व्यापारी सुधीर जैन दररोज पूजेसाठी हा कलश घेऊन येत असत. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर राजकारणीही उपस्थित होते. स्वागताच्या गडबडीत कलश मंचावरून गायब झाला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका संशयिताची हालचाल कैद झाली आहे. पोलिसांनी त्या संशयिताची ओळख पटवली असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे. लाल किल्ला परिसरातील जैन समाजाचे हे अनुष्ठान 15 ऑगस्ट पार्कमध्ये सुरू आहे आणि ते 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.