जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे. कुलदीप सिंग असे शहीद झालेल्या सीआरपीएफ अधिकाऱ्याचे नाव आहे.
उधमपूर जिल्ह्यातील रामनगरमधील चील भागात सीआरपीएफचे पथक गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कुलदीप सिंग शहीद झाले. गस्ती पथकाकडूनही दहशतवाद्यांना प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. यानंतर दहशतवादी पळून गेले. घटनास्थळी अतिरिक्त बळ पाठवण्यात आले असून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांत जम्मूतील उधमपूर, कठुआ, रियासी, डोडा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत दहशतवाद्यांकडून लष्कर, सुरक्षा दल आणि नागरिकांवर हल्ले सुरू आहेत. अचानक हल्ले करून घनदाट जंगलात गायब होणे ही या दहशतवाद्यांची मोडस ऑपरेंडी आहे. दहशतवाद्यांच्या या रणनीतीचा मुकाबला करण्यासाठी कठुआ, पुंछ, राजौरी, रियासी, उधमपूर आणि डोडा जिल्ह्यांच्या पर्वतशिखरांवर लष्कर आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे.