
देशात गेल्या काही दिवसांपासून विमानांना धमकी देण्याचे सत्र सुरू असताना आता शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीतील दोन आणि हैदराबादच्या एका शाळेसह देशातील सीआरपीफच्या अनेक शाळांना ईमेलच्या माध्यमातून बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना दिल्लीच्या रोहीणी परिसरात सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटाच्या दोन दिवसानंतर आली आहे.
मीडिया वृत्तानुसार, या धमक्या सोमवारी रात्री उशीरा ईमेलच्या माध्यमातून शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ईमेल पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, सकाळी 11 च्या सुमारास सर्व सीआरपीएफ शाळांमध्ये स्फोट होईल. इमेल पाठवणाऱ्याने ही धमकी निलंबीत डिएमके नेता जफर सादिक यांच्या अटकेशी जोडली आहे. याआधी एनसीबी आणि नंतर ईडीने अटक केली होती. त्याने हाही दावा केला होता की, सादिक याच्या अटकेनंतर तामिळनाडू पोलिसांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये सीआरपीएफ शाळांना सर्वात पहिली धमकी मिळाली. त्यानंतर देशातील अनेक शाळांना धमकी मिळाली आहे. पोलिसांनी या धमक्यांना अफवा असल्याचे सांगितले आहे.
रविवारी दिल्लीतील रोहिणी भागातील प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आजूबाजूच्या दुकानांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि शाळेच्या भिंतीला छिद्र पडले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका खलिस्तानी समर्थक गटाने टेलिग्रामच्या माध्यमातून स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. ज्या व्यक्तीने ही पोस्ट केली त्या व्यक्तीच्या चॅनेलबद्दल माहिती मिळविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी टेलिग्रामशी संपर्क साधला. याप्रकरणी अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळाजवळ दिसलेल्या दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. परंतु पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागला नाही.