जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं; CRPF च्या दोन जवानांचा मृत्यू, 12 जखमी

जम्मू-कश्मीरमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. उधमपूर जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बसंतगढ भागातील कंडवा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफचे वाहन दरीत कोसळले. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला असून 12 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उधमपूरचे एएसपी संदीप भट यांनी या वृत्ताची पुष्टी केली असून अपघातानंतर पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमी जवानांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामागील कारणांचा तपास सुरू आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही याबाबत ट्विट केले आहे. उधमपूर जिल्ह्यातील कंडवा-बसंतगड भागात सीआरपीएफच्या वाहनाला अपघात झाला आहे. याबाबत डीसी सलोनी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून सर्व अपडेट देत आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून स्थानिक लोकही जखमींना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत, असे सिंह यांनी म्हटले.