
गुणतालिकेत रसातळाला असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने अखेरच्या लीग सामन्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचा 83 धावांनी धुव्वा उडवून ‘आयपीएल’ मोसमाचा किमान शेवट तरी गोड केला. गुजरातला सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे ‘टॉप-टू’मधील स्थान आता डळमळीत झाले आहे. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ड्वेन कॉन्वे व डेवाल्ड ब्रेव्हिस यांची दणकेबाज अर्धशतके आणि त्यानंतर झालेली अचूक गोलंदाजी ही चेन्नईच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. ब्रेव्हिस या विजयाचा शिल्पकार ठरला.
कॉन्वे, ब्रेव्हिस यांची अर्धशतके
उर्विल बाद झाल्यानंतर डेवोन कॉन्वेही आक्रमक झाला. शिवम दुबेने 8 चेंडूंत 2 षटकारांसह 17 धावा करीत त्याला साथ दिली. शाहरुख खानने 13 व्या षटकात दुबेला कोएत्झीकरवी झेलबाद करून चेन्नईला चौथा धक्का दिला. मग पुढच्याच षटकात अर्धशतक पूर्ण करून कॉन्वेही बाद झाला. राशीद खानने त्रिफळा उडविण्यापूर्वी कॉन्वेने 53 धावांच्या खेळीत 35 चेंडूंना सामोरे जाताना 2 षटकारांसह 6 चेंडू सीमापार धाडले. मग डेवाल्ड ब्रेव्हिस व रवींद्र जाडेजा यांनी अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करताना पाचव्या विकेटसाठी 39 चेंडूंत 74 धावांची लयलूट करीत चेन्नईला 230 धावांपर्यंत नेले. ब्रेव्हिसने 23 चेंडूंत 57 धावांची वादळी खेळी करताना अवघ्या 23 चेंडूंत 5 षटकार व 4 चौकारांचा घणाघात केला. प्रसिध कृष्णाने अखेरच्या चेंडूवर त्याला यष्टीमागे बटलरकरवी झेलबाद केले. जाडेजाने 18 चेंडूंत एक षटकार व एका चौकारांसह नाबाद 21 धावांची खेळी केली. गुजरातकडून इम्पॅक्ट प्लेअर प्रसिध कृष्णाने 2, तर साई किशोर, राशीद खान व शाहरुख खान यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
तीन षटकांत तीन विकेट्स
चेन्नईकडून मिळालेल्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव 18.3 षटकांत 147 धावांवरच संपुष्टात आला. अंशुल पंबोजने तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिलला (13) उर्विल पटेलकरवी झेलबाद करून गुजरातला मोठा दणका दिला. मग खलील अहमदने चौथ्या षटकात आलेल्या धोकादायक जोस बटलरला (5) पंबोजकरवी झेलबाद करून चेन्नईला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर पंबोजने पाचव्या षटकात शेरफन रूदरपर्ह्डला भोपळाही पह्डू न देता म्हात्रेकडे झेल देण्यास भाग पाडले. तीन षटकांत तीन फलंदाज बाद झाल्याने गुजरातची 3 बाद 30 अशी दुर्दशा झाली.
चेन्नईची नऊ षटकांत शतकी धावसंख्या
आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर आलेल्या उर्विल पटेलने धावगती कमी होणार नाही, याची खबरदारी घेतली. दुसरा सलामीवीर कॉन्वे एका बाजूने संयमाने साथ देत होता. या दोघांनी नऊ षटकांतच धावफलकावर शतक झळकाविले. अखेर साई किशोरने उर्विलला गिलकरवी झेलबाद केले. झेलबाद होण्यापूर्वी त्याने 19 चेंडूंत 37 धावा फटकाविताना 4 चौकारांसह 2 चेंडू मैदानाबाहेर भिरकावले.
अहमदच्या फिरकीचा नूर
डावखुऱ्या नूर अहमदने गुजरातच्या मधल्या फळीला अलगतपणे आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने राहुल तेवतिया (14), राशीद खान (12) व अर्शद खान (20) या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. इम्पॅक्ट प्लेअर असलेल्या मथिशा पथिरानाने गेराल्ड कोत्झजी (5) याचा त्रिफळा उडविला, तर कम्बोजने साई किशोरला (3) यष्टीमागे धोनीकरवी झेलबाद करून गुजरातचा डाव संपविला. मोहम्मद सिराज 3 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईकडून कम्बोज व नूर अहमद यांनी 3-3 फलंदाज बाद केले.
दरम्यान, प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरविताना सर्वच फलंदाजांनी फटकेबाजी करत आपल्या संघाला 5 बाद 230 धावांचा डोंगर उभारून दिला. चेन्नईची या हंगामातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. आयुष म्हात्रे आणि ड्वेन कॉन्वे या जोडीने 3.4 षटकांत 44 धावांची छोटेखाणी, पण खणखणीत सलामी दिली. आयुषने अर्शद खानच्या दुसऱ्या षटकांत 3 षटकार व 2 चौकारांसह 28 धावा वसूल केल्या. प्रसिध कृष्णाने चौथ्या षटकात आयुषला मोहम्मद सिराजकरवी झेलबाद केले अन् गुजरातने सुटकेचा निःश्वास सोडला. बाद होण्यापूर्वी आयुषने 17 चेंडूंत 3 षटकार व तितक्याच चौकारांसह 34 धावा ठोकल्या.