माढातून बेपत्ता झालेल्या 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला; घातपाताची शक्यता, परिसरात खळबळ

माढा तालुक्यातून 15 जुलैपासून बेपत्ता असलेला कार्तिक बळीराम खंडाळे ( वय 10, रा. अरण, ता. माढा) याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत शनिवारी सकाळी तुळशी मोडनिंब रोडवरील जाधववाडीनजीक कोरड्या कालव्यामध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने परिसरातील खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील अरण येथील कार्तिक बळीराम खंडाळे 15 जुलै रोजी संत सावता माळी विद्यालयाच्या मैदानात सुरू असलेल्या यात्रेत खेळायला गेला होता. तेव्हापासुन तो बेपत्ता होता. याची फिर्याद खंडाळे कुटुंबीयांनी टेंभुर्णी ठाण्यात दिली होती. त्यानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पाच पथकामार्फत बेपत्ता मुलाचा तपास सुरु केला होता. मात्र, त्याचा शोध लागला नाही.

अखेर शनिवारी सकाळी जाधववाडी हद्दीतील कोरड्या कॅनलमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी धाव घेत टेंभुर्णी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. फॉरेन्सिक पथक व श्वान पथक ग्रामीण अन्वेषन विभागाच्या साह्याने तपास सुरू आहे. हा घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुलाचे अपहरण करत त्याचा खून केला असावा किंवा हा नरबळीचा प्रकार असावा, अशा चर्चा सुरु आहेत. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.