आमदार सुलभा खोडके काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित
अमरावती विधानसभेच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षामधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत खोडके यांनी पक्षविरोधी काम केले होते. त्यानंतरही त्या सतत पक्षविरोधी काम करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केले आहे.
पालखी सोहळ्यात पोलिसांची बंदुकीच्या फैरींनी मानवंदना
शहराचे ग्रामदैवत असलेल्या धावीर महाराजांचा भव्य पालखी सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात निघणार आहे. यानिमित्ताने भक्ती व शक्तीचा जागर होणार असून धावीर महाराज की जय। अशा जल्लोषात संपूर्ण रोहे दुमदुमून जाणार आहे. बंदुकीच्या फैरी झाडून महाराजांना पोलीस दलामार्फत मानवंदनाही दिली जाईल. या सोहळ्यात पोलिसांचे बॅण्ड पथक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. धावीर महाराजांच्या मंदिरात 1862 पासून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदा धावीर महाराजांच्या नवरात्रोत्सवाचे 162 वे वर्ष आहे. वैशिष्ट्य म्हणजे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी धावीर महाराजांची पालखी निघते. उद्या संपूर्ण नगराला प्रदक्षिणा घातली जाणार असून संबळ, हलगी, खालुबाजे, ताशे, झांजपथक अशा पारंपरिक वाद्यांच्या साथीने ही परंपरा जपली जाणार आहे.
भिंत कोसळून 7 मजुरांचा मृत्यू
गुजरातमधील मेहसाणा जिह्यात एका कंपनीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात मजुरांचा मृत्यू झाला. भूमिगत टाकी खोदत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मेहसाणा जिह्यात हळहळ व्यक्त होत आहे. यामध्ये आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला.
फाटक्या नोटेमुळे प्रवाशाचा बळी
टिटवाळ्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात 50 रुपयांच्या फाटक्या नोटेवरून कडाक्याचे भांडण झाले. यात रिक्षाचालकाने इतकी भयंकर मारहाण केली की त्यात वर्मी घाव बसून प्रवाशाचा मृत्यू झाला. त्यामुळे मुजोर रिक्षाचालकाच्या भांडणामुळे निष्पाप प्रवाशाचा मृत्यू झाल्याने रिक्षाचालकाच्या विरोधात संताप पसरला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तिघा ड्रग्ज तस्करांना अटक
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकांनी जोगेश्वरी, वांद्रे, गोवंडी या ठिकाणी कारवाई करत 111 ग्रॅम कोकेन व 565 कोडेनमिश्रित बॉटल्स असा 47 लाख किमतीचा ड्रग्जचा साठा हस्तगत केला. या कारवाईत तिघा ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी कक्षाचे आझाद मैदान युनिटला बरं मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून रिचर्ड कोम्मे (34) याला ताब्यात घेतले. याचबरोबर कांदिवली युनिटने वांद्रे येथे अरबाज ऊर्फ जब्बार (26) हा कोडेनमिश्रित सिरपच्या 477 बॉटल्स विकण्यासाठी आला असता त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच घाटकोपर युनिटने गोवंडीच्या शिवाजीनगर येथे इम्रान (27) याला कोडेनमिश्रित सिरपच्या 88 बॉटल्ससह पकडले.